पाचोरा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी सकाळी विमान अपघातात झालेल्या आकस्मिक निधनामुळे संपूर्ण राज्यासह पाचोरा तालुक्यावरही शोककळा पसरली आहे. आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज, २९ जानेवारी रोजी पाचोरा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.

अजित दादांच्या निधनाची बातमी समजताच पाचोरा शहरातील सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि व्यापारी बांधव एकत्र आले. गुरुवारी सकाळपासूनच शहरातील बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. केवळ दवाखाने आणि मेडिकल यांसारख्या अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या होत्या. शहरात सर्वत्र शांतता पसरली असून व्यापाऱ्यांनी स्वतःहून आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून दादांना मानवंदना दिली.

शहरातील मुख्य छत्रपती शिवाजी महाराज चौकात सार्वजनिक श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अजित दादांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
याप्रसंगी आ. किशोर पाटील, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष सुनिल पाटील, शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख तथा न. पा. उपनगराध्यक्ष किशोर बारावकर, काॅंग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नितीन तावडे, विकास पाटील, दत्ता बोरसे, अजहर खान, प्रविण पाटील, मराठा सेवा संघाचे जिभाऊ पाटील, राहुल बोरसे, अनिल सावंत यांचेसह राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि नागरिकांनी दोन मिनिटे मौन पाळून लाडक्या ‘दादां’ना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. “राजकारणातील एक खंबीर आणि कार्यक्षम नेतृत्व हरपल्याची” भावना यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी व्यक्त केली.



