जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील इंद्रप्रस्थ नगरात बंद घर फोडून घरातून चोरट्यांनी कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण ५१ हजार ६२६ रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी बुधवारी २८ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रतिभा दिगंबर काळे (वय ४९) या जळगाव शहरातील इंद्रप्रस्थ नगर भागात राहतात. २७ जानेवारी रोजी सकाळी ६ ते संध्याकाळी ५ वाजेच्या दरम्यान, जेव्हा त्यांच्या घराला कुलूप होते, तेव्हा अज्ञात चोरट्यांनी संधी साधली. चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. बेडरूममधील कपाटाचे लॉक तोडून चोरट्यांनी त्यात ठेवलेले मौल्यवान दागिने आणि रोकड चोरून नेली.

यांच्या घरातून ८ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे मनी, १५ हजार ६२६ रूपये किंमतीचे ३ ग्रॅमची सोन्याची अंगठी, चांदीचे भांडे आणि २० हजार रूपयांची रोकड असा एकुण ५१ हजार ६२६ रूपयांची मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी प्रतिभा काळे यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल सतिष पाटील हे करत आहे.



