चोपडा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यात काल सायंकाळी अचानक झालेल्या अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर चोपडा विधानसभा क्षेत्राचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी तातडीने परिस्थितीची पाहणी करत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर दिला असून, संबंधित प्रशासनाला पंचनामे करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

आडगाव, विरवाडे, विष्णापूर तसेच नागलवाडी व पुणा आदिवासी परिसरातील गावांमध्ये सायंकाळी अचानक ढगफुटीसदृश पाऊस, जोरदार वारे आणि गारपीट झाली. या नैसर्गिक आपत्तीमुळे उभ्या पिकांचे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांचे आर्थिक संकट अधिक गडद झाले आहे. अनेक ठिकाणी केळी, कापूस, मका व इतर हंगामी पिके जमीनदोस्त झाल्याचे चित्र दिसून आले.

या घटनेची माहिती मिळताच आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी संबंधित गावांना भेट देऊन शेतकरी व नागरिकांशी थेट संवाद साधला. त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि प्रशासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा विश्वास दिला. शेतकऱ्यांच्या वेदना ऐकून घेत प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू करावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी उपस्थित तहसीलदार भाऊसाहेब थोरात, तालुका कृषी अधिकारी दीपक साळुंखे, गटविकास अधिकारी एन. आर. पाटील तसेच इतर संबंधित कर्मचाऱ्यांना आमदार सोनवणे यांनी अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे पंचनामे तात्काळ करण्याचे निर्देश दिले. पंचनामे लवकर पूर्ण करून अहवाल शासनाकडे सादर करण्यावर त्यांनी भर दिला.
शेतकऱ्यांच्या नुकसानीची अचूक नोंद होणे अत्यंत आवश्यक असून, त्याआधारे योग्य ती शासकीय मदत मिळवून देण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचेही आमदार सोनवणे यांनी सांगितले. प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करून एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
एकूणच, अवकाळी पावसामुळे त्रस्त झालेल्या चोपडा तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने तातडीने पावले उचलली असून, पंचनाम्यांनंतर शासकीय मदतीची प्रक्रिया वेगाने राबवली जाण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



