Home Cities जळगाव कुंचल्यातून उमटली भावपूर्ण श्रद्धांजली : सुनील दाभाडे यांनी साकारले अजितदादांचे जिवंत तैलचित्र

कुंचल्यातून उमटली भावपूर्ण श्रद्धांजली : सुनील दाभाडे यांनी साकारले अजितदादांचे जिवंत तैलचित्र


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली असताना, जळगावच्या प्रसिद्ध चित्रकार आणि कलाशिक्षक सुनील दाभाडे यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून नेत्याला अनोखी आणि भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. दाभाडे यांनी आपल्या कुंचल्याच्या माध्यमातून अजित पवार यांचे अत्यंत जिवंत आणि बोलके तैलचित्र (Portrait) रेखाटले असून, त्याद्वारे त्यांनी आपल्या भावनांची सांगता केली आहे.

सुनिल दाभाडे हे वास्तववादी चित्रशैलीसाठी ओळखले जातात. या चित्रात त्यांनी अजित पवार यांच्या चेहऱ्यावरची सात्विकता, साधेपणा आणि व्यक्तिमत्त्वाची मृदू छटा अत्यंत सूक्ष्म बारकाव्यांसह टिपली आहे. चित्र पाहताना ते प्रत्यक्ष समोर उभे आहेत, असा भास निर्माण होतो. अत्यंत कमी वेळात तयार केलेले हे चित्र सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले असून, अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे.

सुनिल दाभाडे म्हणाले, “पवार कुटुंबियांवर कोसळलेला हा दुःखाचा डोंगर मोठा आहे. एका कलाकाराकडे शब्दांपेक्षा भावना व्यक्त करण्यासाठी चित्र हेच मोठे माध्यम असते. छत्र हरपण्याचे दुःख मोठे असते, म्हणून मी माझ्या कलेच्या माध्यमातून अजित पवार स्मृतींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला आहे.” त्यांच्या या वक्तव्यातून या चित्रामागील संवेदनशील भावनांचा परिचय होत आहे.

सामाजिक, राजकीय आणि कला क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी या श्रद्धांजलीचित्राचे कौतुक केले आहे. दुःखाच्या या प्रसंगात आपल्या लाडक्या नेत्याला कलेच्या माध्यमातून दिलेली ही मानवंदना अनेकांच्या हृदयाला भिडली आहे. सोशल मीडियावरून देखील या चित्रावर सकारात्मक प्रतिक्रिया उमटल्या आहेत, ज्यातून या कलाकृतीच्या प्रभावाची जाणीव होते.

एकूणच, अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यावर आलेल्या दु:खाच्या छायेत कलाकाराने आपल्या कौशल्याद्वारे व्यक्त केलेली ही श्रद्धांजली लक्षवेधी ठरली आहे. त्यांच्या कुंचल्यातून उमटलेले भाव आणि व्यक्तिमत्त्वाची प्रतिकृती या तैलचित्रात जीवंत झाल्याचे दिसते.


Protected Content

Play sound