वरणगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील राजकीय वर्तुळात आज मोठी खळबळ उडाली आहे. वरणगाव परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाला मोठे खिंडार पडले असून, शेकडो कार्यकर्त्यांनी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना (शिंदे गट) पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला.

या पक्षप्रवेशाचे मुख्य आकर्षण राष्ट्रवादी काँग्रेसचे खंबीर नेते राजेंद्र चौधरी हे ठरले. वरणगाव नगर परिषदेच्या निवडणुकीत राजेंद्र चौधरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. मात्र, नुकतीच त्यांची शिंदे गटाच्या वतीने ‘स्वीकृत नगरसेवक’ पदी वर्णी लावण्यात आली. या पार्श्वभूमीवर, चौधरी यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह राष्ट्रवादीला रामराम ठोकून भगवा झेंडा हाती धरला.

वरणगाव येथे आयोजित एका भव्य जाहीर सभेमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी कार्यकर्त्यांचे स्वागत करत त्यांना शिवबंधनात अडकवले.
राजेंद्र चौधरी यांच्या रूपाने वरणगावात शिवसेनेची ताकद वाढली असून, आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये शिंदे गटाची पकड मजबूत होणार असल्याचे बोलले जात आहे. निवडणुकीत पराभूत उमेदवाराला पक्षात घेऊन थेट नगरसेवक पद दिल्याने शिंदे गटाने राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात मोठी खेळी खेळली आहे.
प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी “एकनाथ शिंदे आणि गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही विकासाच्या प्रवाहात सामील होत आहोत,” अशा भावना व्यक्त केल्या. वरणगाव नगर परिषदेच्या राजकारणात हा मोठा बदल मानला जात आहे. राजेंद्र चौधरींसारखा जनाधार असलेला नेता सोडून गेल्यामुळे भुसावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की: वरणगावमध्ये राजेंद्र चौधरींसारखा मोठा जनाधार असलेला नेता पक्षात आल्याने शिवसेनेची ताकद दुप्पट झाली आहे. समाधान पाटील यांच्या नेतृत्वात येथे शिवसेनेचे ६ नगरसेवक आधीच कार्यरत आहेत. वरणगाव शहराच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प आम्ही केला आहे.” पाटील यांनी पुढे स्पष्ट केले की, “येथे भाजप-शिवसेना युतीचा प्रस्ताव आम्ही मांडला होता, परंतु काही कारणास्तव ती होऊ शकली नाही. त्यामुळे भाजप-शिवसेनेचे काही नगरसेवक आणि अपक्ष नगराध्यक्ष असे विचित्र समीकरण येथे तयार झाले आहे. तरीही महायुतीच्या माध्यमातून वरणगावचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.”



