रावेर–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर नगरपालिकेतील विविध विषय समित्यांच्या निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाला धक्का बसला असून ईश्वरचिठ्ठीमुळे पालिकेतील सत्तासमीकरण पूर्णपणे बदलले आहे. भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचे संख्याबळ समान असताना काँग्रेसच्या चिठ्ठीने निर्णायक भूमिका बजावली आणि परिणामी पाचही विषय समित्यांवर विरोधी गटाचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. यामुळे पालिकेतील सभापती पदांवर विरोधी पक्षाचा झेंडा फडकला आहे.

आज सकाळी नगरपालिकेच्या सभागृहात विषय समित्यांच्या निवडीसाठी विशेष सभा पार पडली. प्रभारी तहसीलदार संजय तायडे व मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली. प्रारंभी पीठासीन अधिकाऱ्यांनी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या समसमान संख्याबळाची माहिती सभागृहास दिली. दोन्ही गटांचे संख्याबळ समान असल्याने सत्ताधारी भाजप आणि उर्वरित काँग्रेस यांच्यात ईश्वरचिठ्ठी काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

रोशनी धनसिंग राठोड या विद्यार्थिनीच्या हस्ते काढण्यात आलेली ईश्वरचिठ्ठी काँग्रेसच्या बाजूने निघाली. प्रत्येक विषय समितीत पाच सदस्यांचा समावेश करण्याचे ठरल्याने भाजपकडे केवळ दोन सदस्य राहिले, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट मिळून तीन सदस्यांचे संख्याबळ तयार झाले. परिणामी प्रत्येक समितीत विरोधी गटाला बहुमत मिळाल्याने भारतीय जनता पक्षाने पाचही समित्यांमधील सभापतीपदाचे अर्ज मागे घेतले.
या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांचे पाचही विषय समित्यांवर पूर्ण वर्चस्व प्रस्थापित झाले. पालिकेतील राजकीय चित्र बदलल्याने भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात असून विरोधकांमध्ये मात्र उत्साहाचे वातावरण आहे.
सार्वजनिक बांधकाम समितीचे सभापतीपद राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नगरसेवक गणेश सोपान पाटील यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. या समितीचे सदस्य म्हणून अनिता मुरलीधर तायडे, राजेश सुधाकर शिंदे, योगिता भूषण महाजन आणि मोहम्मद समी मोहम्मद आसिफ यांची निवड झाली आहे.
स्वच्छता, आरोग्य व दवाखाना समितीच्या सभापतीपदी सादिक शेख अब्दुल नवी यांची निवड करण्यात आली असून अनिता तायडे, गणेश प्रभाकर पाटील, सीमा आरिफ जमादार आणि दारा मोहम्मद जफर मोहम्मद हे सदस्य असतील. पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापतीपदी नरेंद्र विश्वनाथ वाघ यांची नियुक्ती झाली असून खान शाहीन परवीन सफदर, नितीन भगवान महाजन, जयश्री नितीन महाजन आणि गोपाल रत्नाकर बिरपन हे सदस्य आहेत.
महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी सानिया परवीन शेख सऊद यांची निवड करण्यात आली असून उपसभापती म्हणून खान शाहीन परवीन सफदर काम पाहतील. अर्चना पाटील, प्रमिला पाटील आणि खान सुमय्या बी जावीद हे सदस्य असतील. नियोजन व विकास समितीच्या सभापतीपदी आसिफ मोहम्मद दारा मोहम्मद यांची निवड झाली असून अनिता तायडे, राजेंद्र चौधरी, अरुण अस्वार आणि सालेहा कौसर अल्ताफ खान हे सदस्य असतील.
स्थायी समितीत नगराध्यक्ष हे पदसिद्ध सभापती असतात, तर सर्व विषय समित्यांचे सभापती हे सदस्य असतात. या स्थायी समितीत सभापती संगीता भास्कर महाजन यांच्यासह आसिफ मोहम्मद दारा मोहम्मद, गणेश सोपान पाटील, सादिक शेख, नरेंद्र वाघ आणि सानिया परवीन शेख सऊद यांचा समावेश राहणार आहे.



