
मुंबई–वृत्तसेवा। राज्यात नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर आता जिल्हा परिषद निवडणुकांची घोषणा झाली असून, या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा ईव्हीएम मशिनविरोधात बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे. विधानसभा, नगरपालिका आणि महापालिका निवडणुकांमध्ये भाजपला मोठे यश मिळाल्यानंतर विरोधकांकडून ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

राज्य निवडणूक आयुक्तांनी ईव्हीएमबाबत वेळोवेळी स्पष्टीकरण दिले असतानाही, या विषयावरून राजकीय आणि सामाजिक संघटनांमध्ये असंतोष वाढताना दिसत आहे. याच असंतोषातून मुंबईतील राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात थेट घुसून ईव्हीएम विरोधात घोषणाबाजी करण्यात आल्याने प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली.
धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी “ईव्हीएम हटाव, देश बचाओ” अशा घोषणांनी राज्य निवडणूक आयोगाचे कार्यालय दणाणून सोडले. प्रतिष्ठानच्या महिला अध्यक्षा राजश्री उंबरे पाटील यांच्यासह अन्य सहकाऱ्यांनी आयोगाच्या कार्यालयात जाऊन तीव्र निषेध नोंदवला, त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
ईव्हीएमवर बंदी घालावी, सत्ताधारी पक्ष ईव्हीएमचा वापर करून निवडणुका जिंकत असल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी कार्यालयात गोंधळ घातला. तसेच निवडणूक आयोग आमच्या तक्रारींची दखल घेत नसल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. जिल्हा परिषद निवडणुका बॅलेट पेपरवरच घ्याव्यात, अशी ठाम भूमिका आंदोलकांनी मांडली.
ईव्हीएम हटविण्याच्या मागणीसाठी उपोषण सुरू असून, उपोषणकर्ते बाळराजे आवारे यांच्या समर्थनार्थ प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी हा आक्रमक पवित्रा घेतल्याची माहिती आहे. अचानक झालेल्या घोषणाबाजीमुळे आणि गोंधळामुळे पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठी धावपळ करावी लागली.
राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात घोषणाबाजी आणि गोंधळ घातल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठानच्या चार कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. धाराशिव जिल्ह्यातील धर्मवीर संभाजी राजे प्रतिष्ठानचे हे कार्यकर्ते असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.



