जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना रामानंद नगर पोलिसांनी प्रभावी तपास करत दुचाकी चोरट्यांना ताब्यात घेत मोठा पर्दाफाश केला आहे. पिंप्राळा परिसरात घडलेल्या चोरीप्रकरणी सखोल चौकशीत आरोपींकडून तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

शुक्रवार 2 जानेवारी रोजी किरण मधुकर सुरवसे (रा. मारोती पार्क, शिव कॉलनी) हे सायंकाळी सुमारे 6 वाजता त्यांची अंदाजे 60 हजार रुपये किमतीची (MH-19-AY-1797) क्रमांकाची काळ्या रंगाची हिरो कंपनीची स्प्लेंडर दुचाकी घेऊन पिंप्राळा बाजारात आले होते. सायंकाळी सुमारे 7 वाजता अज्ञात चोरट्याने सदर दुचाकी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी CCTNS गुन्हा क्रमांक 05/2026 अन्वये BNS कलम 303(2) प्रमाणे रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सिक्को नंदलाल भालेराव (वय 29, रा. शंकर आप्पा नगर, पिंप्राळा, जळगाव) व महेश राजेंद्र मेहे (वय 23, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) या दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले.
दोन्ही आरोपींची सखोल चौकशी केली असता त्यांनी फिर्यादींची हिरो स्प्लेंडर दुचाकी तसेच जिल्हा पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिरो स्प्लेंडर प्रो आणि हिरो डिलक्स अशा एकूण तीन दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्यानुसार आरोपींकडून तीन मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या असून पुढील तपास सुरू आहे.
या संपूर्ण कारवाईत पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ, पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे, पोलीस हवालदार जितेंद्र राजपूत, जितेंद्र राठोड, सुशील चौधरी व पोलीस कर्मचारी योगेश बारी यांनी सहभाग घेत उत्कृष्ट कामगिरी बजावली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या आदेशान्वये पोलीस हवालदार जितेंद्र राजपूत करीत आहेत.



