Home Cities जळगाव प्राचार्य प्रा. उमेश जाधव यांना ओरिएंटल विद्यापीठाकडून पीएचडी प्रदान

प्राचार्य प्रा. उमेश जाधव यांना ओरिएंटल विद्यापीठाकडून पीएचडी प्रदान


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे हट्टा येथील एस व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य प्रा. उमेश जाधव यांना इंदोर येथील ओरिएंटल विद्यापीठातर्फे नुकतीच पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांच्या या शैक्षणिक यशामुळे फार्मसी शिक्षण व संशोधन क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

प्रा. उमेश जाधव यांनी औषधनिर्माण (फार्मसी) शाखेतून “डेव्हलपमेंट अँड इव्हाल्युएशन ऑफ हर्बल इथोझोम्स ऑफ पॅसिफ्लोरा फोइटिडा लिन फॉर ट्रीटमेंट ऑफ सोरायसिस” या महत्त्वपूर्ण विषयावर आपला संशोधन प्रबंध सादर केला. त्वचारोग उपचारासाठी हर्बल घटकांवर आधारित औषधनिर्मितीच्या दृष्टीने हा संशोधन विषय अत्यंत उपयुक्त आणि नावीन्यपूर्ण असल्याचे मानले जात आहे.

या संशोधन कार्यासाठी त्यांना जळगाव येथील प्रा. डॉ. हर्षल तारे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. संशोधन कालावधीत प्रा. जाधव यांनी सातत्यपूर्ण अभ्यास, प्रयोग आणि वैज्ञानिक विश्लेषणाच्या माध्यमातून दर्जेदार संशोधन सादर केले असून, त्यांच्या कामाची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे.

संशोधन कार्यकाळात त्यांनी दोन शैक्षणिक पुस्तके, तब्बल १०५ शोधनिबंध तसेच दोन पेटंट्स प्रकाशित केली आहेत. फार्मसी आणि औषधनिर्माण क्षेत्रात त्यांनी केलेल्या सखोल आणि दर्जेदार संशोधनामुळे त्यांना विविध मंचांवर गौरविण्यात आले आहे. त्यांच्या संशोधनाचा लाभ भविष्यात औषधनिर्मिती आणि आरोग्य क्षेत्राला होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

पीएचडी पदवी प्रदान प्रसंगी ओरिएंटल विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. अमोल गोरे, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. ध्रुव घई, कुलसचिव प्रा. डॉ. अजयेंद्र नाथ, रिसर्च डीन प्रा. डॉ. धीरज नीम, असोसिएट डीन प्रा. डॉ. क्रतिका डॅनिअल, फार्मसी प्रमुख प्रा. डॉ. सुधा वेंगुर्लेकर, प्रा. डॉ. सचिन कुमार जैन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

याशिवाय श्री धनश्वरी मानव विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. वेदप्रकाश पाटील (माजी कुलगुरू), संस्थेचे सचिव तथा आमदार माननीय डॉ. राहुल पाटील आणि संस्थेचे डायरेक्टर श्याम परिहार यांनीही प्रा. उमेश जाधव यांचे अभिनंदन करत विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील पुढील संशोधनासाठी शुभेच्छा दिल्या.

 


Protected Content

Play sound