Home राजकीय महापालिका निवडणुकांतील बिनविरोध जागांवर वाद; उच्च न्यायालयात याचिका दाखल

महापालिका निवडणुकांतील बिनविरोध जागांवर वाद; उच्च न्यायालयात याचिका दाखल


मुंबई वृत्तसेवा । राज्यातील नगरपालिका निवडणुकांनंतर आता महापालिका निवडणुकांमध्येही मोठ्या प्रमाणावर बिनविरोध निवडी झाल्याने राजकीय वाद निर्माण झाला आहे. भाजप–शिवसेना महायुतीच्या सुमारे ७० जागा बिनविरोध निवडून आल्याचा दावा करण्यात येत असून, या प्रक्रियेवर विरोधकांनी आक्षेप घेत थेट न्यायालयात धाव घेतली आहे.

ठाण्यातील मनसे नेते अविनाश जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाणे आणि कल्याण-डोंबिवली येथील बिनविरोध निवडी या दबाव, धमक्या आणि आर्थिक आमिषांच्या माध्यमातून झाल्याचा आरोप केला. यासंदर्भात काही पुरावेही त्यांनी सादर केल्याचा दावा आहे. या प्रकरणावर त्यांनी पुण्यातील ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. असीम सरोदे यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली असून, त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करण्यात आली असल्याची माहिती सरोदे यांनी दिली.

अ‍ॅड. असीम सरोदे यांनी सांगितले की, राज्यभरात ६८ ते ७० जागा बिनविरोध झाल्या असून त्यापैकी सुमारे ५० जागा भाजपच्या, तर सुमारे २० जागा शिंदे गटाच्या असल्याचा आरोप आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्थानिक मुद्द्यांवर लढा अपेक्षित असतो, मात्र प्रत्यक्षात दबावाच्या राजकारणामुळे ही प्रक्रिया दूषित होत असल्याचा दावा त्यांनी केला. नगरसेवकांची ‘खरेदी-विक्री’ होत आहे का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

या प्रकरणात निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही संशय व्यक्त करण्यात आला असून, आयोग सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत बिनविरोध निवडणुकांचे निकाल जाहीर करू नयेत, असे निर्देश निवडणूक आयोगाला देण्याची विनंती याचिकेत करण्यात आली आहे.

दरम्यान, बिनविरोध निवड ही संकल्पना लोकप्रतिनिधी कायद्यात स्पष्टपणे नमूद नाही, असा मुद्दाही याचिकेत मांडण्यात आला आहे. निवडून आलेल्या उमेदवारांसाठी किमान मतदान टक्केवारी निश्चित करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. पुण्यातील काही बिनविरोध निवडींविरोधात काँग्रेसचे समीर गांधी यांनीही स्वतंत्रपणे न्यायालयात दाद मागितल्याची माहिती देण्यात आली आहे.

 


Protected Content

Play sound