Home आरोग्य पाठीच्या मणक्याच्या गुंतागुंतीच्या फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

पाठीच्या मणक्याच्या गुंतागुंतीच्या फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया


जळगाव, लाईव्ह ट्रेंडस न्यूज । पाय घसरून पडल्याने पाठीच्या मणक्याला गंभीर इजा होऊन चालण्याची क्षमता गमावलेल्या ७५ वर्षीय महिलेचे दोन्ही पाय डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात झालेल्या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे पुन्हा कार्यक्षम झाले आहेत. मेंदू व मणका शल्यचिकीत्सकांच्या तज्ज्ञ पथकाने अत्यंत क्लिष्ट शस्त्रक्रिया करून रुग्णाला नवजीवन दिले.

बिलखेडे (ता. धरणगाव) येथील सुनंदाबाई जगतराव भदाणे या वृद्ध महिलेला पडल्यामुळे पाठीच्या खालच्या भागात तीव्र वेदना सुरू झाल्या. काही वेळातच दोन्ही पायांना मुंग्या येणे, अशक्तपणा आणि चालता न येणे अशी लक्षणे दिसू लागली. प्रकृती बिघडत असल्याने नातेवाईकांनी त्यांना तातडीने डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात दाखल केले.

रुग्णालयात तपासणीदरम्यान एमआरआयमध्ये डी-११, डी-१२ आणि एल-१ या मणक्यांमध्ये फ्रॅक्चर झाल्याचे आढळले. फ्रॅक्चरमुळे मज्जासंस्थेवर दाब येत असल्याने पायांची ताकद मोठ्या प्रमाणात कमी झाली होती. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन तातडीने शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला.

मेंदू व मणका शल्यचिकीत्सक डॉ. विपूल राठोड यांच्या नेतृत्वाखाली सुमारे तीन तास चाललेली ‘डी-११ ते एल-१ पेडीकल स्क्रू फिक्सेशन विथ डी-१२ लॅमिनोटोमी’ ही अत्याधुनिक शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. या प्रक्रियेत फ्रॅक्चर झालेल्या मणक्यांना स्थिर करून मज्जासंस्थेवरील दाब कमी करण्यात आला. शस्त्रक्रियेसाठी डॉ. अतुल जाधव, निवासी डॉ. श्रुती खंडागळे, डॉ. प्रितम दास आणि डॉ. व्ही. सतीश यांनी सहकार्य केले.

शस्त्रक्रियेनंतर काही तासांतच पायातील मुंग्या कमी झाल्या आणि हळूहळू ताकद परत येऊ लागली. योग्य उपचार व पुनर्वसनामुळे रुग्णाला पुन्हा चालता येऊ लागले. विशेष म्हणजे ही संपूर्ण शस्त्रक्रिया शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत करण्यात आली. “मणक्याच्या फ्रॅक्चरकडे दुर्लक्ष केल्यास कायमस्वरूपी अपंगत्व येण्याचा धोका असतो. वेळेत अचूक तपासणी आणि योग्य शस्त्रक्रिया केल्यास रुग्ण पुन्हा सामान्य जीवन जगू शकतो,” असे मत डॉ. अतुल जाधव, मेंदू व मणका विकार तज्ज्ञ यांनी व्यक्त केले.


Protected Content

Play sound