Home प्रशासन नगरपालिका मुक्ताईनगरात पिसाटलेल्या कुत्र्यांचा उच्छाद; नगरपंचायतीच्या निष्क्रियतेवर संताप

मुक्ताईनगरात पिसाटलेल्या कुत्र्यांचा उच्छाद; नगरपंचायतीच्या निष्क्रियतेवर संताप

0
126

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  शहरात पिसाटलेल्या कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर बनत असून, नागरिकांच्या सुरक्षिततेला थेट धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे शहरातील मुक्ताईनगर पोलीस स्टेशनच्या आवारातच कुत्र्यांचा हैदोस सुरू असल्याने कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. नगरपंचायतीकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस उपाययोजना न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

शहरातील प्रमुख रस्ते, शासकीय कार्यालयांचे परिसर, बाजारपेठा तसेच रहिवासी वस्ती भागांमध्ये कुत्र्यांचा मुक्त संचार सुरू असून सामान्य नागरिकांना रस्त्यावरून चालणेही अवघड झाले आहे. तहसील कार्यालय परिसरासह आजूबाजूच्या भागातही कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. काही ठिकाणी अचानक कुत्र्यांचे हल्ले होत असल्याच्या घटनांमुळे नागरिक मानसिक तणावाखाली असल्याचे चित्र दिसून येत आहे.

या पिसाटलेल्या कुत्र्यांमुळे लहान मुले, शाळकरी विद्यार्थी, महिला तसेच ज्येष्ठ नागरिक सर्वाधिक धोक्यात आले आहेत. सकाळी शाळेत जाणारी मुले, पहाटे व संध्याकाळी फिरायला बाहेर पडणारे नागरिक कायम भीतीच्या छायेत वावरत आहेत. कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे जखमी होण्याच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना अधिकच बळावली आहे.

नागरिकांचे म्हणणे आहे की, नगरपंचायतीने यापूर्वीही अशा समस्या निर्माण झाल्यावर दुर्लक्ष केल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. कुत्र्यांचे निर्बंध, पकड मोहीम किंवा प्रतिबंधात्मक उपाययोजना वेळेत राबविल्या असत्या तर आज ही समस्या इतकी गंभीर झाली नसती, असा आरोपही रहिवाशांकडून केला जात आहे. प्रशासनाकडून कोणतीही स्पष्ट कार्ययोजना जाहीर न झाल्याने नागरिकांचा रोष वाढत चालला आहे.

दरम्यान, नगरपंचायतीने तात्काळ पिसाटलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मुक्ताईनगर शहरासह परिसरातील नागरिकांनी दिला आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

आता तरी नगरपंचायत या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देणार का, की एखादी दुर्दैवी घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार, असा थेट सवाल मुक्ताईनगरकरांकडून उपस्थित केला जात आहे.

 


Protected Content

Play sound