जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावातील चिमुकलीवर झालेले क्रूर अत्याचार व निर्घृण हत्येचे प्रकरण संपूर्ण राज्याला हादरवून सोडणारे ठरले आहे. बालसुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उभा करणाऱ्या या घटनेने समाजात संतापाची लाट निर्माण झाली असून, या पार्श्वभूमीवर छावा मराठा युवा महासंघ उत्तर महाराष्ट्र विभागातर्फे आरोपीस सर्वात कठोर शिक्षा देण्याची मागणी करत जळगाव जिल्हाधिकारीमार्फत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात नमूद केल्यानुसार ग्रामीण भागात वाढत्या बालसुरक्षेच्या समस्येकडे प्रशासनाने तातडीने गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे. डोंगराळेतील या अमानवी घटनेमुळे महिला व मुलींच्या सुरक्षिततेबाबत नागरिकांमध्ये निर्माण झालेला अविश्वास दूर करण्यासाठी कठोर उपाययोजना गरजेची असल्याचे संघटनेचे मत आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, जनजागृती कार्यक्रम आणि सुरक्षा यंत्रणा प्रबळ करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे निवेदनातून स्पष्ट करण्यात आले.

संघटनेने या प्रकरणाची न्यायालयीन प्रक्रिया फास्ट-ट्रॅक न्यायालयातून प्राधान्याने करून आरोपीस फाशीची शिक्षा देण्याची ठाम मागणी केली आहे. तसेच डोंगराळे गावात बालसुरक्षा, महिला सुरक्षा आणि जनजागृतीसाठी विशेष मोहीम राबवावी, ग्रामीण भागात सीसीटीव्ही बसवणे, बीट-पोलिस गस्त आणि रात्रीच्या गस्त पथकांची क्षमता वाढवणे यांसारखे उपाय तातडीने राबवावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. पीडित कुटुंबाला शासकीय मदत, मानसिक आधार आणि सुरक्षा तातडीने उपलब्ध करून द्यावी, अशीही संघटनेची मागणी आहे.
निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांना देण्यात आले. यावेळी छावा मराठा युवा महासंघाचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष अमोल कोल्हे, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष किरण ठाकूर, महानगर उपाध्यक्षा विद्या झनके, योगिता वाघ, उज्ज्वला सपकाळे, शारदा तायडे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सागर साळुंखे, आनंद महिरे, भीमराव सोनवणे, कैलास पवार, सुधाकर पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.



