Home Cities पारोळा पारोळा नगरपालिकेच्या उमेदवारी छाननीत नगराध्यक्षपदासाठी ५ अर्ज पात्र, ३ अपात्र  नगरसेवक पदांमध्ये...

पारोळा नगरपालिकेच्या उमेदवारी छाननीत नगराध्यक्षपदासाठी ५ अर्ज पात्र, ३ अपात्र  नगरसेवक पदांमध्ये २४ अर्ज बाद

0
195

पारोळा–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पारोळा नगरपालिका निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांनी मोठ्या संख्येने अर्ज दाखल करून रंगत वाढवली होती. नगराध्यक्ष पदासाठी ८ तर नगरसेवक पदांसाठी तब्बल १५५ अर्ज दाखल झाले होते. आज छाननी अहवाल जाहीर होताच निवडणूक प्रक्रियेत पहिल्याच टप्प्यात मोठी चाचपणी झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

छाननीनंतर नगराध्यक्ष पदासाठी दाखल झालेल्या ८ अर्जांपैकी ५ अर्ज पात्र घोषित करण्यात आले असून ३ अर्ज विविध त्रुटींमुळे अपात्र ठरले आहेत. त्यामुळे आता नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत स्पर्धा पाच उमेदवारांमध्ये राहणार आहे. यात पात्र झालेल्या अर्जात चंदक्रांत भिकनराव पाटील (अपक्ष), चंदक्रांत भिकनराव पाटील (शिवसेना), अंजली करण पाटील(जन आधार विकास पार्टी), अंजली करण पाटील शिवसेना (उबाठा), सुवर्णा वसंत पाटील (राष्ट्रीय काँग्रेस पार्टी) यांच्या अर्जाचा समावेश आहे. तर किरण चंद्रकांत पाटील (शिवसेना), रोहन वसंतराव मोरे (भाजप), संतोष दगडू गुरव (अपक्ष) यांचे अर्ज अपात्र ठरले आहेत. नगराध्यक्ष पदासाठी सुरुवातीपासूनच चुरस लक्षवेधी होती, आणि छाननीनंतरची आकडेवारी पाहता येणाऱ्या टप्प्यात स्पर्धा अधिक रोचक होणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

नगरसेवक पदासाठी दाखल झालेल्या १५५ अर्जांपैकी १३१ अर्ज पात्र ठरले असून तब्बल २४ अर्ज अपात्र ठरले आहेत. काही अर्जांमध्ये आवश्यक कागदपत्रांचा अभाव, चुकीची माहिती, तसेच प्रक्रियात्मक त्रुटी आढळल्यामुळे त्यांना अपात्र घोषित करण्यात आले. मोठ्या संख्येने उमेदवारी दाखल झाल्याने प्रत्येक प्रभागातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पात्र उमेदवारांची अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर प्रचाराला अधिक गती मिळेल आणि स्थानिक पातळीवरील राजकीय तापमान आणखी वाढेल, अशी अपेक्षा आहे. पारोळा नगरपालिकेची निवडणूक यंदा विशेष लक्षवेधी ठरणार असून मतदारांमध्येही मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.


Protected Content

Play sound