यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल नगरपरिषद निवडणूक 2025 साठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी मोठी राजकीय हालचाल झाली असून शहरातील वातावरण पूर्णपणे निवडणूकमय झाले. नगराध्यक्ष पदासाठी पाच तर नगरसेवक पदासाठी ४८ अर्ज दाखल झाल्याची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण सहा नगराध्यक्षपदासाठी आणि १३० नगरसेवकपदासाठी अर्ज दाखल झाले आहेत.
अखेरच्या दिवशी भाजपाच्या वतीने रोहिणी उमेश फेगडे यांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला. तसेच शिवसेना (शिंदे गट) तर्फे स्वाती मनोहर पाटील, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीतर्फे अफरीन अंजूम शेख अलीम, तर अपक्ष म्हणून चैताली प्रशांत पाटील आणि सुलेमानी शबानाबी आरिफखा यांनी अर्ज दाखल केले. २३ नगरसेवक निवडणुकीसाठी विविध पक्ष व अपक्षांकडून एकूण ४८ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले.

भाजपाकडून फैजपूर रोडवरील श्री मनुदेवी मंदिरापासून शहरातील मुख्य मार्गाने भव्य शक्तिप्रदर्शन रॅली काढण्यात आली. आमदार अमोल जावळे यांच्या मार्गदर्शनानंतर रॅलीला प्रारंभ झाला. शहरात सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने नगरपालिका परिसर यात्रेचे स्वरूप धारण करून गजबजलेला दिसत होता. शेकडो समर्थकांच्या उपस्थितीत उमेदवारांनी उत्साहात अर्ज दाखल केले.
निवडणूक निर्णय अधिकारी मोहनमाला नाझीरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिवसभर अर्ज पडताळणीचे काम सुरळीत पार पाडले. सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी काटेकोर व्यवस्था ठेवण्यात आली.
अर्ज दाखल प्रक्रियेमुळे यावल शहरात निवडणुकीची रंगत वाढली असून आगामी दिवसांत माघारीनंतरचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.



