मुक्ताईनगर -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजपासून राजकीय वातावरण तापू लागले आहे. नगराध्यक्ष पदासाठी आज पहिला अर्ज दाखल होताच मुक्ताईनगरच्या राजकारणात नवचैतन्य निर्माण झाले आहे. हा अर्ज वैशाली अशोक जावरे यांनी दाखल केला असून, त्यांनी आज नगरपंचायत कार्यालयात माननीय तहसीलदार यांच्याकडे विधिवतरीत्या आपली उमेदवारी सादर केली आहे.
नगराध्यक्ष पदासाठी विविध पक्षांतील नेते व कार्यकर्ते यांच्यात जोरदार हालचाली सुरू असतानाच पहिला अर्ज दाखल झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. शहरातील अनेक नामांकित इच्छुकांनी आतापर्यंत फक्त दावेदारी दाखवली होती, परंतु अर्ज दाखल करण्यास मात्र टाळाटाळ होत होती. आज झालेल्या या अर्ज दाखलामुळे इतर इच्छुकांच्या हालचालींना आता वेग येण्याची शक्यता आहे.

राजकीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बहुतांश संभाव्य उमेदवार आपापल्या पक्षाकडून एबी फॉर्म मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे शहरात जरी शांततेचे वातावरण दिसत असले तरी ती “वादळापूर्वीची शांतता” असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
दरम्यान, अपक्ष उमेदवारांनी मात्र नगराध्यक्ष व नगरसेवक पदांसाठी अर्ज दाखल करण्याची लगबग वेगाने सुरू केली आहे. आगामी काही दिवसांत नगराध्यक्षपदासाठी काटे की टक्कर पाहायला मिळेल, हे आता निश्चित झाले आहे.



