
मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । माळेगाव येथील एका शेतकऱ्याच्या मालकीच्या वाड्यातून तब्बल 30 मेंढ्या चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली असून शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. या चोरीप्रकरणी रामकृष्ण बापु बिचकुले (वय 37, व्यवसाय शेती व मेंढपाळ) यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

रामकृष्ण बिचकुले हे माळेगाव, ता. मुक्ताईनगर येथे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. त्यांच्यासोबत पत्नी देवकाबाई, दोन मुलं अनंत व हरी, तसेच मधला भाऊ तुळशिराम व वहिनी सरुबाई राहतात. त्यांच्याकडे एकूण 113 मेंढ्या आहेत. या मेंढ्यांसाठी त्यांनी सारोळा शिवारातील शेत गट नं. 127/4 मध्ये वाडा उभारलेला आहे, जिथे त्यांचा भाऊ तुळशिराम कुटुंबासह वास्तव्यास असतो. सध्या तुळशिराम आपल्या आईसोबत बाळुमामाच्या दर्शनासाठी बाहेरगावी गेला आहे.
रामकृष्ण यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते 24 जुलै 2025 रोजी रात्री 2 वाजता नाशिकहून घरी परतले. 25 जुलै रोजी सकाळी 6 वाजता वाड्यावर गेले असता त्यांना चोरीची माहिती मिळाली. त्यावेळी त्यांच्या वहिनी सरुबाई, पुतेणे समाधान विश्वनाथ बिचकुले व त्याची पत्नी निर्मालाबाई तसेच इतर मेंढपाळ वाड्याजवळ उपस्थित होते. सरुबाई यांनी सांगितले की, 24 जुलै रोजी रात्री 12 वाजता त्या मुलांसोबत वाड्यावर झोपल्या होत्या. सकाळी उठल्यानंतर वाड्याच्या कंपाऊंडची तार कापलेली दिसली. त्यानंतर मेंढ्यांची पाहणी करताना 30 मेंढ्या गायब असल्याचे लक्षात आले.
शेजारील वाड्यांमधील मेंढपाळांशी चौकशी केली असता, कुणालाही या मेंढ्यांविषयी काही माहिती मिळाली नाही. त्यामुळे 24 जुलैच्या रात्री 12 ते 25 जुलैच्या सकाळी 6 या वेळेत अज्ञात चोरट्यांनी वाड्यातील कंपाऊंड फोडून ही चोरी केली, याची खात्री झाल्याचे रामकृष्ण यांनी सांगितले. चोरीला गेलेल्या मेंढ्यांचे एकूण बाजारमूल्य अंदाजे 2 लाख 10 हजार रुपये इतके आहे. यामध्ये 28 मादी मेंढ्या (लाल, काळा व पांढरा रंग), तसेच दोन नर मेंढे — एक खर्डा रंगाचा व एक काळ्या रंगाचा — यांचा समावेश आहे. वय 3 ते 5 वर्षांच्या वयोगटातील हे सर्व मेंढे होते.
या संपूर्ण घटनेबाबत अज्ञात चोरट्यांविरुद्ध कायदेशीर तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून तपास सुरू आहे. चोरीची ही घटना शेतकऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर असून अशा प्रकारच्या चोरीला आळा बसावा यासाठी स्थानिक प्रशासन व पोलीस यंत्रणेला कठोर भूमिका घ्यावी लागणार आहे.



