जळगाव प्रतिनिधी । वीजग्राहकांना घरबसल्या वीजबिलांचा भरणा करण्याची ऑनलाईन सोय उपलब्ध करून दिल्यानंतर जळगाव परिमंडळात 2 लाख 94 हजार वीजग्राहक 58 कोटी 38 लाख रुपयांच्या वीजबिलांचा ऑनलाईन भरणा करीत आहेत. अशी माहिती जनसंपर्क अधिकारी ज्ञानेश्वर आर्दड यांनी दिली आहे.
महावितरणची वेबसाईट व मोबाईल ॲप तसेच अन्य पर्यायांद्वारे ऑनलाईन वीजबिल भरणा क्रेडीट कार्ड वगळता निःशुल्क करण्यात आला आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या काळात वीजबिल भरणा केंद्राच्या रांगेत उभे राहणे किंवा गर्दी टाळून घरबसल्या कोणत्याही वेळेत ऑनलाईन वीजबिल भरण्याची सोय वीजग्राहकांना उपलब्ध आहे. सद्यस्थितीत महावितरणचे राज्यातील 65 लाख वीजग्राहक दरमहा सरासरी 1416 कोटी रुपयांचा ऑनलाईन भरण केला जात आहे.
महावितरणने लघुदाब वीजग्राहकांसाठी ऑनलाईन बिल भरण्यासाठी www.mahadiscom.in ही वेबसाईट तसेच जून 2016 पासून मोबाईल ॲपद्वारे चालू व मागील वीजबिल पाहणे आणि त्याचा ऑनलाईन भरणा करण्यासाठी नेट बँकिंग, क्रेडीट/डेबीट कार्डासह मोबाईल वॉलेट व कॅश कार्डचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. वीजग्राहकांना त्यांच्या एकाच खात्यातून स्वतःच्या अनेक वीजजोडण्यांबाबतही सेवा उपलब्ध आहे. त्यामुळे वीजबिल भरणा केंद्रात जाऊन रांगेत उभे राहण्याऐवजी ऑनलाईन वीजबिल भरण्यास वीजग्राहकांची पसंती वाढलेली आहे.
लघुदाब वीजग्राहकांसाठी ऑनलाईन बिल भरण्यासाठी दरमहा 500 रुपयांच्या मर्यादेत 0.25 टक्के सूट देण्यात येत आहे. क्रेडीट कार्ड, डेबीट कार्ड, यूपीआय, भिम, इंटरनेट बँकिंग, मोबाईल वॉलेट, मोबाईल बँकिंगद्वारे वीजबिल भरणा केल्यास वीज देयकामध्ये 0.25 टक्के सूट देण्यात येत आहे. याआधी नेट बँकिंगचा अपवाद वगळता वीजबिलांचा ऑनलाईन भरणा करण्यासाठी 500 रुपयांपेक्षा अधिक रकमेवर शुल्क आकारण्यात येत होते. परंतु क्रेडीट कार्ड वगळता नेट बँकिंग, डेबीट कार्ड, कॅश कार्ड, यूपीआय, डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून ऑनलाईन होणारा वीजबिल भरणा आता निःशुल्क आहे.
ऑनलाईन वीजबिल भरणा केल्यानंतर लगेचच ग्राहकाच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे पोच देण्यात येत आहे. याशिवाय महावितरणच्या वेबसाईटवर व मोबाईल ॲपवर मागील वर्षभराच्या महिन्यांतील बिलांचा तपशील व रक्कम भरल्याची पावती उपलब्ध आहे. यासोबतच लघुदाब वर्गवारीतील औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती ग्राहकांचे वीजबिल 10 हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास त्यांना आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे थेट वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी या ग्राहकांच्या वीजबिलांवर महावितरणच्या बँक खात्याचा तपशीलही देण्यात येत आहे.
सद्यस्थितीत जळगाव परिमंडलात 2 लाख 94 हजार वीजग्राहक 58 कोटी 38 लाख रुपयांच्या वीजबिलांचा ऑनलाईन भरणा करीत आहेत. सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने वीजग्राहकांनी आरोग्यविषयक काळजी घेत रांगेत किंवा गर्दीच्या ठिकाणी जाऊन इतर व्यक्तींच्या संपर्कात येण्याऐवजी एका क्लिकवर उपलब्ध असलेल्या ऑनलाईन सोयीद्वारे घरबसल्या वीजबिलांचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.