बीड – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराडच्या जामिन अर्जावर बीड न्यायालयात आज चुरशीची सुनावणी पार पडली. जवळपास तीन तास रंगलेल्या युक्तिवादात कराडच्या वकिलांनी सुमारे १ तास ४५ मिनिटे युक्तिवाद केला, तर सरकारी वतीने प्रसिद्ध विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी प्रभावी युक्तिवाद सादर करत जामिनाला जोरदार विरोध केला. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेत निकाल राखून ठेवला असून, पुढील सुनावणी ३० ऑगस्ट रोजी होणार आहे.
कराडच्या बाजूने अॅड. सत्यवृत्त जोशी यांनी युक्तिवाद करत सांगितले की, अटकेच्या वेळी पोलिसांनी त्याला अटकेची कारणे सांगितली नव्हती, त्यामुळे अटक प्रक्रियाच बेकायदेशीर ठरते. तसेच खटल्यातील प्रमुख पुरावा मानल्या जाणाऱ्या मोबाईल संभाषणाबाबतही त्यांनी शंका उपस्थित केली. जो कॉल रेकॉर्ड असल्याचे सांगितले जात आहे, तो त्याच तारखेला झालाच नसल्याचा दावा करत, कराडचा मोबाईल फोन त्या वेळी सक्रिय नव्हता, असे त्यांनी सांगितले.

यावर प्रत्युत्तर देताना उज्ज्वल निकम यांनी सीडीआर (कॉल डिटेल रेकॉर्ड) दाखवून न्यायालयाचे लक्ष वेधले की, कराडनेच सुनील शिंदे याला फोन केला होता. तसेच शिंदे आणि कराड यांच्यात झालेल्या संभाषणाचे प्रत्यक्ष पुरावेही पुढील टप्प्यावर न्यायालयात सादर केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. कराडचा हा मोबाईल कॉलच हत्या प्रकरणातील मोठा पुरावा असल्याचा दावा त्यांनी केला.
दुसऱ्या आरोपी विष्णू चाटेच्या बाजूने देखील दोषमुक्तीसाठी युक्तिवाद झाला. मात्र निकम यांनी यावर तीव्र आक्षेप नोंदवत सांगितले की, चाटेची खंडणीसंबंधीची पार्श्वभूमी न्यायालयाच्या निदर्शनास आणलेली आहे आणि त्याने कराडला या गुन्ह्यात पूर्ण साथ दिली होती. “तो कराडचा उजवा हात होता,” असे निकम यांनी ठासून सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की, ‘मकोका’ कायद्याच्या तरतुदी गुन्ह्याच्या स्वरूपावर अवलंबून असतात, व्यक्तीवर नाहीत. त्यामुळे चाटेच्या वकिलांचे म्हणणे अर्थहीन असल्याचे निकम म्हणाले.
संपूर्ण सुनावणीत न्यायालयाने दोन्ही बाजूंकडून सादर करण्यात आलेल्या मुद्द्यांचा सखोल विचार केल्यानंतर निकाल राखून ठेवण्याचा निर्णय घेतला असून, यावर अंतिम निर्णय ३० ऑगस्ट रोजी होणार आहे.



