Home क्राईम रेल्वेखाली सापडले अनोळखी व्यक्तीचे प्रेत; भुसावळ रेल्वे पोलिसांकडून वारसांचा शोध सुरू

रेल्वेखाली सापडले अनोळखी व्यक्तीचे प्रेत; भुसावळ रेल्वे पोलिसांकडून वारसांचा शोध सुरू


भुसावळ–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ रेल्वे स्टेशनवर आज पहाटे एक हृदयद्रावक प्रकार समोर आला आहे. रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वर एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला असून, तो कोणत्यातरी गाडीखाली आल्याने जागीच ठार झाल्याचे प्राथमिक निष्कर्ष आहेत. भुसावळ रेल्वे पोलिसांनी घटनेची नोंद घेऊन मयताच्या ओळखीचा आणि वारसांचा शोध सुरू केला आहे.

दि. 18 ऑक्टोबर 2025 रोजी पहाटे सुमारे 2.15 वाजताच्या सुमारास ड्युटीवर असलेल्या रेल्वे पोलिसांना स्टेशनच्या नागपूर एंड साईडवर एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह दिसल्याची माहिती देण्यात आली. तत्काळ घटनेची पाहणी केली असता, सदर व्यक्तीचा डावा पाय मांडीपासून तुटून शरीरापासून वेगळा झाला होता. गंभीर जखमा आणि अतिरक्तस्रावामुळे त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

मयत व्यक्तीचे वय अंदाजे 35 ते 40 वर्षे असून, उंची सुमारे 5 फुट 3 इंच आहे. चेहरा लांबट, रंग काळा सावळा, शरीरयष्टी मध्यम, तसेच केस आणि दाढी काळी व वाढलेली आहे. विशेष ओळख म्हणून उजव्या हातावर “SK” असे गोंदलेले आहे आणि त्याच हातात लाल दोरा बांधलेला आहे.

मयताने अंगावर तपकिरी रंगाचा फुलबाह्यांचा शर्ट, त्याखाली तपकिरी सॅन्डो बनियान आणि कथ्थ्या रंगाची निकर परिधान केली होती. सदर व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी भुसावळ रेल्वे पोलिसांनी सर्वत्र माहिती प्रसिद्ध करण्याचे आवाहन केले आहे.

सदर मयत व्यक्तीबाबत कोणी ओळख पटवू शकत असल्यास किंवा त्याच्या वारसांबाबत कोणतीही माहिती असल्यास तपासी अमलदार स.फौ. संजय जंजाळकर (मोबा. नं. 9823102334) यांच्याशी किंवा रेल्वे पोलीस ठाणे भुसावळ (फोन नं. 02582-222338) येथे तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 


Protected Content

Play sound