जळगाव : लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी : सावखेडा बु. येथील कै. श्रीमती ब. गो. शानभाग विद्यालयात “फटाके-मुक्त दिवाळी” साजरी करण्याबाबत मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक मनपा पर्यावरण विभागाचे अधिकारी प्रकाश पाटील होते.

कार्यक्रमाची सुरुवात पक्षीमित्र उमेश इंगळे यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांच्या परिचयाने झाली. मार्गदर्शन करताना श्री. पाटील यांनी विद्यार्थ्यांना फटाक्यांमुळे होणारे पर्यावरण व आवाज प्रदूषण तसेच आरोग्यावर होणारे दुष्परिणाम याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक व प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले.

या वेळी विद्यार्थ्यांनी “हरित दिवाळी – स्वच्छ दिवाळी” या घोषवाक्याखाली प्रतिज्ञा घेतली. शिक्षक व विद्यार्थ्यांनी मार्गदर्शनाचे मनोभावे स्वागत करून फटाके न फोडण्याचा निर्धार व्यक्त केला. अशा प्रकारे हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी, ज्ञानवर्धक आणि पर्यावरणपूरक ठरला.



