Home क्राईम खळबळजनक ! धुळ्यात एकाच वेळी १२ श्वानांचा मृत्यू , नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

खळबळजनक ! धुळ्यात एकाच वेळी १२ श्वानांचा मृत्यू , नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण


धुळे – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातून खळबळजनक वृत्त समोर आले आहे. शहरातील देवपूर परिसरात 12 श्वान मृत्युमुखी पडले आहेत. देवपुरामधील इंदिरा गार्डन भागातील वर्षा बिल्डिंगजवळ एकाच वेळी 12 श्वानांचा मृत्यू झाला आहे. अचानकपणे श्वानांचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या श्वानांच्या मृत्यूचे कारण अद्याप उघड झालेले नाही. तसेच या श्वानांच्या मृत्यूमुळे नागरिकांच्या जीविताला काही धोका तर नाही ना? याची देखील कारणमीमांसा करण्यात येत आहे.

मागील काही काळापासून धुळे शहरात मोकाट श्वानांची संख्या वाढली आहे. यामुळे नागरिकांना विविध प्रकारच्या त्रासांना सामोरे जावे लागत होते.  अशातच आता देवपुरातील इंदिरा गार्डन परिसरातील वर्षा बिल्डिंगजवळ 12 श्वानांचा मृत्यू झाल्याने नागरिकांसह पालिका प्रशासनाच्याही चिंतेत वाढ झाली आहे. अनेकदा श्वानांमुळे अपघातही होत असतात. तसेच काही श्वानांची लहान मुलांवर तसेच जेष्ठ नागरिकांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे श्वानांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी धुळे महापालिका प्रशासनाकडून श्वान निर्बिजीकरण सुरू करण्यात आले आहे.

धुळ्यात श्वानांचा मृत्यू का झाला याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मानवी हस्तक्षेपामुळे या श्वानांचा मृत्यू झाला का हे तपासणे गरजेचे आहे. त्याचबरोबर नंदुरबारमध्येही श्वानांच्या संख्येत वाढ झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. नंदुरबारमध्येही श्वानांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे.


Protected Content

Play sound