Home Cities जळगाव जळगाव जिल्ह्यात दुपारी १.३० वाजेपर्यंत २९.४९ टक्के मतदान

जळगाव जिल्ह्यात दुपारी १.३० वाजेपर्यंत २९.४९ टक्के मतदान


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांसाठी आज सकाळी ७.३० वाजता मतदानास प्रारंभ झाला असून नागरिक मोठ्या संख्येने मतदान केंद्रांकडे धाव घेत आहेत. सकाळपासूनच अनेक केंद्रांवर लांबच लांब रांगा दिसून येत असून लोकशाही पर्वात सहभागी होण्याचा उत्साह स्पष्टपणे जाणवत आहे.

दुपारी १.३० वाजेपर्यंत जिल्ह्यात एकूण २९.४९ टक्के मतदान नोंदवण्यात आले आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार सकाळच्या तुलनेत दुपारपर्यंत मतदानात लक्षवेधी वाढ झाली असून मतदारांमध्ये चांगली जागृती पाहायला मिळत आहे. विशेषतः महिला आणि प्रथमच मतदान करणाऱ्या युवकांचा सहभाग लक्षणीय असल्याचे निरीक्षण आहे.

यावल नगरपरिषदेने आजही मतदानाच्या टक्केवारीत आघाडी कायम ठेवली असून ४०.७९ टक्के मतदानासह ती पहिल्या क्रमांकावर आहे. फैजपूर ३८.९६ टक्के आणि एरंडोल ३८.७८ टक्के मतदानासह पुढील क्रमांकावर आहेत. दुसरीकडे भडगाव येथे केवळ १७.८५ टक्के मतदान नोंदवले गेले असून ते सर्वांत कमी मतदान करणारे ठिकाण ठरले आहे.

जिल्ह्यातील विविध नगरपरिषद व नगरपंचायतींची मतदान टक्केवारी पुढीलप्रमाणे —
जामनेर २७.९७, भुसावळ २७.९९, यावल ४०.७९, फैजपूर ३८.९६, पाचोरा २४.१३, वरणगाव ३३.३३, अमळनेर २८.७६, चाळीसगाव २९.५५, सावदा २५.२२, चोपडा २६.२४, भडगाव १७.८५, रावेर ३४.५५, धरणगाव ३४.७२, एरंडोल ३८.७८, पारोळा ३१.१०, नशिराबाद २९.०५, मुक्ताईनगर २७.१५, शेंदुर्णी ३४.०२. एकूण मतदानाचा आकडा २९.४९ टक्क्यांवर पोहोचला आहे.

जिल्ह्यात सर्व मतदान केंद्रांवर शांततेत मतदान सुरू असून अद्याप कोणतीही अनर्थकारक घटना घडलेली नाही. दुपारनंतर मतदारांची उपस्थिती आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. मतदान प्रक्रियेत शिस्त राखावी आणि अधिकाधिक नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन करून निवडणूक विभागाने जनजागृतीही वाढवली आहे.


Protected Content

Play sound