जळगाव प्रतिनिधी | एक महिना उलटून गेल्यानंतरही एसटीचे कर्मचारी आंदोलनावर ठाम असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान निलंबन झालेल्या आज २८ चालक आणि वाहक कामावर हजर झाले आहेत. तर, सुनावणीसाठी फक्त १८ कर्मचार्यांनी हजेरी लावल्याची माहिती जळगाव परिवहन विभागाच्या अधिकार्यांनी दिली आहे.
जळगाव जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्यांचा बेमुदत संप सुरू आहे. कर्मचार्यांना पगारवाढीसह अन्य मागण्यापैकी काही मागण्या करण्यात आल्या असल्या तरी संप सुरूच आहे. त्यामुळे जळगाव विभागातील ३३२ संपकरी कर्मचार्यांवर निलंबन, ७८ जणांसह २ अनुकंपा मधील रोजंदारी कर्मचार्यांची सेवासमाप्तीचे आदेश देण्यात आले आहेत. तर मेस्माचा देखिल इशारा देण्यासह, विभागातील ११ आगारांतर्गत १७ कर्मचार्यांवर बदली कारवाई करण्यात आली. निलंबन झालेल्या ३३२ कर्मचार्यांपैकी १३१ जणांना समक्ष सुनावणी नोटीस बजावण्यात आली. त्यापैकी १८ कर्मचारी या सुनावणीला उपस्थित झाले तर अन्य कर्मचारी अनुपस्थित असल्याची माहिती जळगाव परिवहन विभाग अधिकार्यांनी दिली.
मात्र असे असले तरी एसटी कर्मचार्यांचे शासनात विलीनीकरण आणि मयत कर्मचार्यांच्या कुटुंबियांविषयी कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसल्याने बहुतांश एसटी कर्मचारी अजूनही संपावर ठाम असल्याने संप मिटण्याची चिन्हे दृष्टीपथात नसल्याचे चित्र आहे.
एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी गेल्या महिनाभरापासून संप सुरू आहे. शासनाच्या आदेशानुसार, संपात सहभागी कर्मचार्यांवर निलंबन सेवा समाप्ती, विभागातील आगारांतर्गत बदली कारवाई सुरू करण्यात आली. याआधी जिल्ह्यात संपात सहभागी असलेल्या एकूण ३३२ कर्मचार्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. तर ७८ जणांसह २ रोजंदारीवरील कर्मचार्यांवर सेवा समाप्ती तसेच १७ जणांवर बदली कारवाई करण्यात आली आहे.
जिल्ह्यात ११ आगारात वाहक, चालक, यांत्रीकी व प्रशासकिय असे ४,४४२ कर्मचारी कार्यरत असून ८६ कर्मचारी रजेवर आहेत. उर्वरित ३९२० कर्मचार्यांपैकी संपात सहभागी असलेल्या ३३२ कर्मचार्यांचे निलंबनाच्या कारवाईच्या भीतीने २८ चालक व २१ वाहक कर्मचारी मंगळवार दरम्यान परिवहन सेवेत हजर झाले आहेत. या कर्मचार्यांच्या माध्यमातून सद्यस्थितीत पाचोरा, जळगाव, अमळनेर, चोपडा, धुळे अशा मार्गांवर ५ साध्या व शिवशाही बस चालविल्या जात आहेत. त्यामुळे लालपरी अजूनही सुरळीत सुरू झालेली नसल्याने सर्वसामान्यांना खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
दरम्यान, राज्य सरकारने एसटी कर्मचार्यांना वेतनवाढ दिली असून कामावर हजर कर्मचार्यांचे ऑक्टोबर महिन्यातील वेतन आणि डिसेंबर महिन्यातील वेतन याची कर्मचार्यांना माहिती व्हावी, यासाठी या दोन महिन्यांची तफावत आणि सविस्तर माहिती असणारे देय वेतनचिठ्ठी आगारांमध्ये लावण्यात येणार आहे. कामावर हजर झालेल्या कर्मचार्यांच्या बँक खात्यावर पगार जमा होणार आहे. अद्यापही बहुतांश कर्मचारी कामावर हजर झालेले नाहीत किंवा ज्यांच्या सेवा समाप्ती अथवा निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे, अशा कर्मचार्यांना यातून वगळण्यात आले आहे. ७ डिसेंबर पासून कर्मचार्यांचे पगार त्यांच्या बँक खात्यावर जमा होण्यास सुरूवात झाली असून येत्या दोन-तीन दिवसात ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचेही विभाग अधिकार्यांनी सांगीतले.
एसटी महामंडळाच्या ३३२ निलंबित कर्मचार्यांपैकी १३१ कर्मचार्यांना समक्ष सुनावणीसाठी नोटीस देण्यात आली आहे. त्यापैकी फक्त १८ कर्मचारी उपस्थित झाले तर अनुपस्थित असलेल्या कर्मचार्यांना पुन्हा एक शेवटची संधी देण्यात येणार आहे. यानंतरही उपस्थित न झाल्यास या कर्मचार्यांच्या परतीच्या मार्गात अडथळे येण्याची शक्यता असून या कर्मचार्यांच्याबाबत एकतर्फी निर्णय देखिल होऊ शकतो, असे अधिकार्यांनी म्हटले आहे.