
जळगाव (प्रतिनिधी) येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली आज महिला लोकशाही दिन पार पडला. या महिला लोकशाही दिनात विविध विभागांशी संबंधित 26 तक्रार अर्ज प्राप्त झालेत.
दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिलांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी लोकशाही दिनाचे आयेाजन करण्यात येते. त्यानुसार आजच्या महिला लोकशाही दिनाचे आयेाजन करण्यात आले होते. या महिला लोकशाही दिन कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी वामनराव कदम, जिल्हा उपनिबंधक मेघराज राठोड, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी आर. आर. तडवी, महिला बाल विकास अधिकारी रमेश काटकर, सहाय्यक पोलीस निरिक्षक निता कोमटे, तहसिलदार वैशाली हिंगे, मंदार कुलकर्णी, महिला बाल विकास कार्यालयातील विधी अधिकारी संध्या वानखेडे, यांचेसह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
महिला लोकशाही दिनात जानेवारी ते जून 2019 दरम्यान एकूण 511 तक्रार अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातील बहुतांशी अर्ज हे सहकार खात्यांच्या अंतर्गत येणाऱ्या पतसंस्थांमधील ठेवीसंबंधी आहेत. हे सर्व अर्ज सर्व संबंधित विभागांकडे तातडीने कार्यवाही करण्यासाठी पाठविण्यात आले आहे. या अर्जांवर संबंधित विभागप्रमुखांनी तातडीने कार्यवाही करुन केलेल्या कार्यवाही अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी आज झालेल्या महिला लोकशाही दिनात दिलेत. त्याचप्रमाणे जी प्रकरणे न्यायालयात न्यायप्रविष्ठ आहेत अशी प्रकरणे लोकशाही दिनात आणू नये. असेही जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.