Home क्राईम पोलिस भरतीत धावताना २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू

पोलिस भरतीत धावताना २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू


छत्रपती संभाजीनगर- वृत्तसेवा | छत्रपती संभाजीनगर येथे सुरू असलेल्या पोलिस भरती प्रक्रियेदरम्यान १६०० मीटर धावताना एका २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना शनिवारी सकाळी घडली. देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून पोलिस दलात भरती होण्यासाठी आलेल्या या तरुणाचा मैदानावरच प्राण गेल्याने भरती प्रक्रियेत सहभागी उमेदवारांमध्ये शोककळा पसरली आहे.

मृत तरुणाचे नाव संग्राम धोंडीराम शिंदे असून तो सांगली जिल्ह्यातील रहिवासी होता. पोलिस दलात भरती होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो गेल्या काही महिन्यांपासून कठोर सराव करत होता. भरती प्रक्रियेसाठी तो छत्रपती संभाजीनगर येथे आला होता.

शनिवारी सकाळी सुमारे ८.१५ वाजता ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या मैदानावर १६०० मीटर धावण्याची मैदानी चाचणी सुरू होती. संग्रामने धावण्यास सुरुवात केली; मात्र काही अंतर पार केल्यानंतर त्याला अचानक चक्कर आली आणि तो मैदानावरच कोसळला.

ही घटना लक्षात येताच तेथे उपस्थित पोलिस कर्मचारी आणि वैद्यकीय पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. संग्रामला प्राथमिक उपचार देऊन तातडीने जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर भरती प्रक्रियेत काही काळ खंड पडला असून इतर उमेदवारांमध्ये भीती आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.

संग्राम शिंदे हा अत्यंत जिद्दी आणि मेहनती तरुण असल्याचे त्याच्या मित्रांनी सांगितले. पोलिस दलात भरती होऊन कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्याचा त्याचा निर्धार होता. मात्र नियतीने त्याचे स्वप्न अधुरे ठेवले. त्याच्या अकाली निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दरम्यान, संग्रामच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक अंदाजानुसार हृदयविकाराचा झटका किंवा तीव्र शारीरिक ताण यामुळे ही घटना घडली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. अधिकृत कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. पोलिस प्रशासनाने या घटनेची नोंद करून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.


Protected Content

Play sound