जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर येथील एका प्रौढ व्यक्तीला विमा पॉलीसीचे आमिष दाखवत सुमारे २२ लाखांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात फेब्रुवारी २०२४मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील एका संशयिताला सायबर पोलीसांनी दिल्ली येथून अटक केली आहे. राहुल पाल सुखबीर सिंग (वय ३७, रा. अशोक नगर, दिल्ली) असे अटक केलेल्या ठगाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रावेर येथील फिर्यादी संजय कुलकर्णी (वय ५९) यांना अज्ञात आरोपींची विमा पॉलिसीचे आमिष दाखवून २२ लाखांत फसवणूक करण्यात आली होती. तर याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात फेब्रुवारी २०२४ ला गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असतांना तांत्रिक मदतीच्या आधारे संशयित हा दिल्ली येथील रहिवाशी असल्याचे समोर आले. त्यानुसार सायबर पोलीस स्टेशनने तपास करून संशयित आरोपी राहुल पाल सुखबीर सिंग (वय ३७, रा. अशोक नगर, दिल्ली) याला दिल्ली येथून अटक केली.
त्याच्याकडून अद्याप मुद्देमाल मिळून आलेला नाही. संशयित राहुल पाल याला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायमूर्ती डी.ए. सरनायक यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्याची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वसंत बेलदार, श्रीकांत चव्हाण, ललित नारखेडे, प्रदीप चौधरी, उज्वला माळी यांनी केली आहे.