गणेशोत्सव काळात २०२ विशेष रेल्वे गाडया धावणार

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | गणेशोत्सव अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपला आहे. कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्यांची लगबग दरवर्षी असते. या निमित्त दरवर्षी कोकण रेल्वेकडून विशेष गाड्यांचे देखील नियोजन केले जात असते. यावर्षी देखील गणेशोत्सव काळात विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तब्बल २०२ विशेष गाड्या कोकणासाठी गणेशोत्सव काळात सोडल्या जाणार आहेत. या मुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होणार आहे.

कोकणात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. गणेशोत्सवासाठी प्रामुख्याने दोन दिवसांआधी कोकणवासीय नागरिक आपल्या घरी जात असतात. कोकणातील नागरिक मोठ्या प्रमाणात मुंबईत राहतात. हे सर्व गणेशोत्सव काळात गावी जात असतात. गावी जाणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी कोकण रेल्वेने गणेशोत्सव काळात २०२ विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे.

सीएसएमटी ते सावंतवाडी १८ फेऱ्या तर सावंतवाडी ते सीएसएमटी दरम्यान रेल्वेच्या १८ फेऱ्या होणार आहेत. तर सीएसएमटी ते रत्नागिरी आणि रत्नागिरी ते सीएसएमटी प्रत्येकी १८ विशेष गाड्या सोडल्या जाणार आहेत. दिवा-चिपळूण आणि चिपळूण-दिवा प्रत्येकी १८ फेऱ्या, तर सीएसएमटी ते कुडाळ आणि कुडाळ ते सीएसएमटी प्रत्येकी तीन फेऱ्या होणार आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनस ते कुडाळ आणि कुडाळ ते लोकमान्य टिळक टर्मिनस प्रत्येकी १८ फेऱ्या होणार आहे. तर लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी आणि सावंतवाडी ते लोकमान्य टिळक टर्मिनस प्रत्येकी १८ फेऱ्या सोडण्याचे रेल्वेचे नियोजन आहे.

Protected Content