भडगावात व्यापाऱ्याच्या कारमधून २ लाखाची रोकड लांबविली; पोलीसात गुन्हा

भडगाव प्रतिनिधी । शहरातील आयटीआय महाविद्यालयाजवळ कार चालक कारचे चाक बदलवत असल्याचा फायदा घेत गाडीतील २ लाख ६ हजार रूपयांची रोकड लांबविल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक माहिती अशी की, भिकन आनंदा पाटील (वय-४५) रा. सातगाव डोंगरी ता. पाचोरा हे व्यापारी आहेत. व्यापारी असल्यामुळे पाटील हे  व्यवहार करण्यासाठी रोकड रक्कम सोबत ठेवतात. दरम्यान, दिवसभरातील कलेक्शन घेवून ते ११ मे रोजी रात्री ११.२० वाजेच्या सुमारास भडगावकडून पाचोराकडे कारने जात असतांना कारच्या चाक पंक्चर झाले. भिकन पाटील हे कारचे चाक बदलवत असल्याचे पाहून अज्ञात चोरट्याने संधीचा फायदा घेवून कारमधील दोन लाख ६ हजार रूपयांची रोकड चोरून नेली. हा प्रकार भिकन पाटील यांच्या लक्षात येताच त्यांनी भडगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. भडगाव पोलीस ठाण्यात पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रल्हाद शिंदे करीत आहे.

 

Protected Content