रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर महसूल विभागाच्या जलद कार्यवाहीमुळे रावेर तालुक्यातील पाल गावातील सुमारे १८८ भूमीहीन कुटुंबांना शासनाकडून हक्काची जागा मिळणार आहे. सध्याच्या महागाईच्या काळात जागा विकत घेणे सर्वसामान्य कुटुंबांसाठी जवळपास अशक्य झाले आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांना सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून तात्पुरत्या झोपड्यांमध्ये राहावे लागत होते. मात्र, शासनाच्या या नव्या निर्णयामुळे या कुटुंबांना आता घरकुलासाठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध होणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने निर्णयाला गती
पाल येथील भूमीहीन कुटुंबांना घरकुल योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळावा यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी विशेष पुढाकार घेतला. त्यांच्या निर्देशानुसार, तहसीलदार बंडू कापसे यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाने पाल गावाशेजारील गट नंबर २८८ मधील जागा या १८८ कुटुंबांना देण्यासाठी वेगाने कार्यवाही सुरू केली आहे. यामुळे अनेक वर्षांपासून स्वतःच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या गरीब व वंचित कुटुंबांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

गरिबांच्या जीवनात स्थैर्य
महसूल विभागाच्या या तत्परतेमुळे लवकरच पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या जागेचे अधिकृत वाटप केले जाणार आहे. यामुळे या कुटुंबांना केवळ घरकुल योजनेचा लाभच मिळणार नाही, तर त्यांच्या जीवनात स्थैर्य आणि सुरक्षितता येईल. सरकारच्या या निर्णयाचे पाल परिसरातील ग्रामस्थांनी स्वागत केले असून, यामुळे खऱ्या अर्थाने गरजू कुटुंबांना न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.



