बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेअंतर्गत वीजबिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करीत केवळ ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडणाऱ्या महावितरणच्या परिमंडलातील पर्यावरणस्नेही १४ हजार २६६ ग्राहकांकडून १७ लाख ११ हजार ९२० रुपयांची वार्षिक बचत सुरू आहे.
महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेनुसार वीजग्राहकांनी छापील वीजबिलाच्या कागदाऐवजी फक्त ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडल्यास प्रतिबिलात १० रुपये सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे योजनेत सहभागी ग्राहकांची वीजबिलांमध्ये वार्षिक १२० रुपयांची बचत होत आहे.शिवाय वीजबिल तयार झाल्यानंतर लगेचच संगणकीय प्रणालीद्वारे ते ‘गो-ग्रीन’मधील ग्राहकांना ‘ई-मेल’द्वारे पाठविण्यात येते. सोबतच ‘एसएमएस’द्वारे देखील वीजबिलाची माहिती देण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांना ‘प्रॉम्प्ट पेमेंट’चा अधिकचा लाभ घेणे अधिक शक्य झाले आहे. गो-ग्रीन योजना ही काळाची गरज आहे. वीजग्राहकांनी या योजनेत सहभागी व्हावे व पर्यावरण रक्षणात योगदान द्यावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.
अकोला परिमंडलांतर्गत अकोला जिल्ह्यात ५ हजार ४५९ ग्राहक ‘गो-ग्रीन’ योजनेत सहभागी झाले आहेत. बुलडाणा जिल्ह्यात ‘गो-ग्रीन’मध्ये ६ हजार ३६९ ग्राहक सहभागी आहेत. तसेच वाशिम जिल्ह्यात २ हजार ४३८ ग्राहकांनी ‘गो-ग्रीन’मध्ये सहभाग घेतला आहे. महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेचा पर्याय निवडण्यासाठी ग्राहकांनी वीजबिलावर छापलेल्या जीजीएन (GGN) या १५ अंकी क्रमांकाची नोंदणी महावितरणच्या मोबाईल अॅपद्वारे किंवा महावितरणच्या संकेतस्थळाच्या https://pro.mahadiscom.in/Go-Green/gogreen.jsp लिंकवर जाऊन करावी. याबाबतची अधिक माहिती www.mahadiscom.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ‘गो-ग्रीन’ योजनेत सहभागी झालेल्या वीजग्राहकांना छापील वीजबिलांची गरज भासल्यास त्यांना ईमेलद्वारे प्राप्त झालेले दरमहा वीजबिल संगणकात सॉफ्ट कॉपीमध्ये जतन करून ठेवता येईल. आवश्यकतेप्रमाणे वीजग्राहकांना ते कधीही डाऊनलोड करण्याची किंवा मूळ स्वरूपात रंगीत प्रिंट करण्याची सोय आहे.याशिवाय वीज ग्राहकांना गो- ग्रीन नको असेल तर ही सुविधा अनरजिस्टर करण्याची व्यवस्थापण प्रणालीत करण्यात आलेली आहे.