Home Cities जळगाव जळगाव जिल्ह्यातील १६ भाविक उत्तराखंडात सुरक्षित !

जळगाव जिल्ह्यातील १६ भाविक उत्तराखंडात सुरक्षित !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । उत्तराखंडमधील अतिवृष्टी आणि ढगफुटीमुळे अडकलेल्या जळगाव जिल्ह्यातील १६ भाविकांना सुखरूप दिल्लीमार्गे जळगावला परत आणण्यासाठी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्लीत विशेष पाठपुरावा सुरू केला आहे. त्यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक घेऊन उपाययोजनांना सुरुवात केली आहे.

या बैठकीला स्मिता शेलार, आशुतोष दिवेदी (सहाय्यक निवासी आयुक्त, महाराष्ट्र सदन) तसेच प्रमोद कोलपते (व्यवस्थापक, महाराष्ट्र सदन) हे उपस्थित होते. बैठकीत भाविकांना मदत करण्यासाठी राज्य सरकारच्या विविध यंत्रणांमध्ये समन्वय साधण्याचा निर्णय घेण्यात आला. पालकमंत्री पाटील यांनी उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांचे खासगी सचिव हिमांशू यांच्याशी थेट संवाद साधला. त्यांनी भाविकांना शक्य तितक्या लवकर दिल्लीपर्यंत आणण्याची विनंती केली, ज्याला हिमांशू यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. भाविकांच्या सुरक्षिततेबाबत पूर्ण सहकार्य आणि लवकरात लवकर दिल्लीमार्गे सुटकेची व्यवस्था केली जाईल, असे आश्वासन हिमांशू यांनी दिले. यावेळी उत्तराखंडचे पोलीस उपमहानिरीक्षक निलेश भरणे यांच्याशीही पालकमंत्र्यांचे बोलणे झाले.

गुलाबराव पाटील हे कालपासून दिल्लीमध्येच तळ ठोकून संबंधित यंत्रणांशी समन्वय साधत आहेत. त्यांनी जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी नियमित संपर्क ठेवून राज्य आपत्ती व्यवस्थापन विभाग, रेल्वे प्रशासन व इतर यंत्रणांशी समन्वय सुरू केला आहे.

जळगाव जिल्ह्यातील पाळधी (ता. धरणगाव) येथील १३ तरुण आणि जळगाव येथील एका कुटुंबातील ३ व्यक्ती सध्या उत्तराखंडमधील हर्षिलजवळील भगिरथी होमस्टे, बागोरी येथे अडकले आहेत. अडकलेल्या भाविकांमध्ये रोहन दिनेश माळी, रोहील बंडू माळी, मनोज संजय चौधरी, ज्ञानेश्वर संजय माळी, दीपक रत्नाकर सोनार, सुखदेव नन्नवरे, दीपक माळी, वैभव गंगवणे, संदीप माळी, विशाल पाटील, रिवेश माळी, भूषण माळी, पवन माळी यांचा समावेश आहे. तसेच जळगाव शहरातील अनामिका मेहरा, त्यांची कन्या आरोही मेहरा आणि पती रुपेश मेहरा हेही यात अडकले आहेत. सर्व भाविक सुरक्षित असल्याची माहिती असून, त्यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या सुटकेसाठी उत्तराखंड प्रशासन आणि दिल्लीतील महाराष्ट्र सदनमार्फत तातडीच्या उपाययोजना केल्या जात आहेत.

उत्तराखंडमध्ये अडकलेल्या भाविकांच्या जळगावमधील नातेवाईकांना धीर देताना पालकमंत्री पाटील म्हणाले, “सरकार आपल्यासोबत आहे. सर्व यंत्रणा कार्यरत असून भाविकांना सुखरूप परत आणले जाईल.”


Protected Content

Play sound