पुणे प्रतिनिधी । पुण्यातील कोंढवा भागात एका इमारतीची भिंत झोपड्यांवर कोसळून १५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली.
यााबाबत मिळालेली माहिती अशी की, पुण्यातील कोंढवा भागात सोसायटीची भिंत कोसळून १५ मजुरांचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दल आणि स्थानिकांकडून बचावकार्य सुरु असून तिघांना जिवंत बाहेर काढण्यात यश मिळाले आहे. प्राथमिक माहितीनुसार रात्री दीड ते दोनच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये बहुतांश मजूरांचा समावेश असून अद्यापही ढिगार्याखाली काही लोक असण्याची शक्यता आहे. एनडीआरएफच्या चमूने घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्यास प्रारंभ केला आहे. दरम्यान, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.
आल्कन स्टायलस सोसायटीची संरक्षक भिंत कोसळून हा अपघात झाला असून मृतांमधील सर्व जण बिहार आणि पश्चिम बंगालमधील मजूर असल्याचे कळते. जिल्हाधिकारी नवलराम यांनी आज पहाटेच घटनास्थळी पाहणी करून यात दोषी असणार्या सर्वांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.