मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातील धाराली परिसरात झालेल्या भीषण भूस्खलन आणि पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील विविध भागांतील १५१ पर्यटक अडकले आहेत. या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री मा. गिरीश महाजन हे तातडीने उत्तराखंडकडे रवाना झाले आहेत. आज सायंकाळी साडेचार वाजता ते देहरादून येथे दाखल होत आहेत, जेणेकरून बचावकार्यात थेट समन्वय साधता येईल.
राज्य आपत्ती नियंत्रण कक्ष (SEOC), महाराष्ट्राने दिलेल्या माहितीनुसार, अडकलेल्या १५१ पर्यटकांपैकी १२० जणांशी संपर्क साधण्यात यश आले असून ते सुरक्षित स्थळी आहेत. उर्वरित ३१ पर्यटकांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. राज्य आपत्ती नियंत्रण कक्ष, महाराष्ट्र हे उत्तराखंड राज्य नियंत्रण कक्ष, जिल्हा नियंत्रण कक्ष (DEOC उत्तरकाशी) तसेच राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद केंद्र (NERC), नवी दिल्ली यांच्याशी सातत्याने समन्वय साधत आहे.

महाराष्ट्राचे मुख्य सचिव यांनी आज अपर मुख्य सचिव (आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग) यांच्यासोबत मंत्रालयातील आपत्कालीन कार्य केंद्रात परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी उत्तराखंडचे मुख्य सचिव आनंद बर्धन यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून महाराष्ट्रातील अडकलेल्या नागरिकांना आवश्यक ती तातडीची मदत करण्याबाबत विनंती केली.
संचालक (आपत्ती व्यवस्थापन), उत्तराखंड यांच्याकडून महाराष्ट्र सरकारला प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार, बचाव कार्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत:
धाराली परिसरातील सर्व पर्यटकांना हेलिकॉप्टरद्वारे हर्षल हेलीपॅड येथून गंगोत्री येथे स्थलांतरित केले जाणार आहे. गंगोत्री ते धराली मार्गावर बस/अवजड वाहनांची व्यवस्था करण्यात आली असून, धराली ते हर्षील दरम्यान पायी प्रवासाचे नियोजन आहे. गंगोत्री ते हर्षील दरम्यान यात्रेकरूंच्या सुरक्षिततेसाठी १० आयटीबीपी (ITBP) पथके तैनात करण्यात आली आहेत; प्रत्येक पथक ३० पर्यटकांना संरक्षण देईल. लष्कर, NDRF, SDRF आणि स्थानिक बचाव पथके सध्या धराली परिसरात कार्यरत आहेत. संपर्क यंत्रणा आणि रस्ते अद्याप पूर्ववत झाले नसून, त्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
NERC च्या माहितीनुसार हवाई बचाव कार्य सुरू झाले असून, लष्कराच्या छोट्या सॉर्टींमार्फत स्थलांतर सुरू आहे. बचाव कार्यासाठी उत्तराखंडमध्ये उपग्रह फोन (Satellite Phone) तैनात करण्यात आले असून, राजीव स्वरूप, आयजीपी हे जबाबदार अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
पर्यटकांचे शेवटचे स्थान समजण्यासाठी डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशनला सूचित करण्यात आले असून, त्यांच्या मदतीने शोधकार्य सुलभ होईल. राज्य आपत्कालीन कार्य केंद्र, महाराष्ट्र हे आवश्यक समन्वय साधून बचाव, मदत आणि कुटुंबीयांना माहिती पुरविण्याचे कार्य सातत्याने करीत आहे.



