मुख्यमंत्र्यांच्या मावसभावाची नाणारमध्ये १४०० एकर जमीन – निलेश राणे

मुंबई । एकीकडे शिवसेना लोकांना भडकावून नाणारबाबत आंदोलन करत असतांना मुख्यमंत्र्यांच्या मावसभावाने या परिसरात तब्बल १४०० एकर जागा विकत घेतली असल्याचा गंभीर आरोप आज भाजप नेते निलेश राणे यांनी केला आहे.

याबाबत निलेश राणेंनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, नाणार प्रकल्प रद्द झाला आहे असं सांगितलं जात असताना मुख्यमंत्री कार्यालयाशी चर्चा का होतेय? ही चर्चा प्रकल्प रायगडमध्ये नेण्यासाठी नव्हे तर राजापूर तालुक्यात नाणारमध्ये हा प्रकल्प राबवण्यासाठी कंपनी आणि शासनातील काही अधिकारी प्लॅनिंग करत आहेत. नाणार पुन्हा राजापूर तालुक्यात आणण्यासाठी हे एकत्र आले आहेत. नाणारमध्ये सुगी डेव्ल्हपर्स म्हणून कंपनी आहे, त्यात निशांत सुभाष देशमुख हे संचालक आहेत, ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मावस भाऊ आहे. त्यांनी १४०० एकर जमिनीचा व्यवहार केला आहे. हा व्यवहार ज्यांनी केला ते अँड. कावतकर हे कोदवलीचे आहेत. सगळे व्यवहार २०१४ ते २०१९ या काळात व्यवहार झाला असं त्यांनी सांगितले.

तसेच युतीच्या काळात शिवसेना नेत्यांनी मुखवटे घालून लोकांना भडकावून प्रकल्पाविरोधात आंदोलन केले, तेव्हा त्यांच्या मावशीचा मुलगा जमिनीचे व्यवहार करत होता. सुगी कंपनीने मध्यस्थी राहून जमिनीचे व्यवहार केले, त्यात ८० टक्के जमिनीचे व्यवहार परप्रांतीयांशी केले. ऋतुजा डेव्ल्हपर्स कंपनी जी पुण्याची आहे, तिनेही नाणारमध्ये ९०० एकर व्यवहार केला आहे. राजापूर एमआयडीसीमध्येही भ्रष्टाचार करण्यात आला आहे. कोवड, बारसू, सोलगाव येथे एमआयडीसी येणार असं नक्की झालं.  शिवसेनेचे पदाधिकारी संकेत खळपे, गजानन कोलवणकर, करण भुतकर यांनी शेतकर्‍यांकडून जमिनीची पॉवर ऑफ अर्टिनी घेतली, ज्या सातबारावर शासनाने बंदी आणली आहे. याच्या व्यवहाराला परवानी नसताना एमआयडीसीमधील बंद सातबार्‍याची खरेदी झाली आहे. नाणार आणि राजापूर एमआयडीसी जी याच सरकारने जाहीर केली, त्यात शिवसेनेच्या काही पदाधिकार्‍यांचे हात बरबटलेले आहेत असा आरोप निलेश राणेंनी केला.

Protected Content