रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर तालुक्यातील चोरवड चेकपोस्ट जवळ वाहन तपासणी दरम्यान महाराष्ट्रात बंदी असलेला 14 लाख रुपयांचा गुटखा आणि 8 लाखांची गाडी रावेर पोलिसांनी पकडली आहे. यामुळे गुटखा माफियामध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणी रावेर पोलिस स्टेशनमध्ये दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
घटनेची माहिती अशी आहे की, चोरवड नाका येथील नाकाबंदी दरम्यान एमएच 04 एचवाय 6515 महिंद्रा बोलेरो कंपनीची चारचाकी गाडी येताना दिसली. रावेर पोलिसांनी गाडी थांबवून तपासणी केली असता, गाडीत सुमारे 14 लाखांचा सुगंधित केसयुक्त विमलपान मसाला आणि तंबाकूजन्य गुटखा मिळून आला. या प्रकरणी रावेर पोलिसांनी रिजवान शेख रऊफ (वय 28) आणि शेख शोयब शेख शरीफ (वय 27), दोन्ही राहणार छत्री चौक पठाण वाडी, फैजपुर ता. यावल, यांच्या विरुद्ध महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी बंदी असल्याने गुन्हा दाखल केला आहे. पो. कां. संभाजी रघुनाथ बिजागरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्यात अन्नसुरक्षा आयुक्तांच्या अधिसूचना क्रमांक – असुमाअ/अधिसूचना 794/2018/7 दि. 20/07/2018 नुसार हे अन्नपदार्थ सार्वजनिक हिताच्या दृष्टीने प्रतिबंधीत करण्यात आले आहेत.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि अंकुश जाधव करीत आहेत. अटक केलेले दोन्ही आरोपींना रावेर न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, सहाय्यक पोलीस अधिक्षक फैजपुर अन्नपूर्णा सिंग, पोनि डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील सपोनि अंकुश जाधव, पोहेकॉ संजय मेढे,पोकाँ विशाल पाटील, पोकाँ प्रमोद पाटील, विशाल पाटील,रविंद्र भांबरे,पो.कॉ संभाजी बिजागरे,यांच्या पथकाने ही कार्यवाई केली आहे.