Home राजकीय रावेर नगरपरिषदेतील प्रभाग क्रमांक ११ मध्ये १३ उमेदवार इच्छुक! दोन पत्रकारांच्या उमेदवारीने भाजपसमोर...

रावेर नगरपरिषदेतील प्रभाग क्रमांक ११ मध्ये १३ उमेदवार इच्छुक! दोन पत्रकारांच्या उमेदवारीने भाजपसमोर डोकेदुखी वाढली


रावेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर नगरपरिषद निवडणुकीत नव्याने अस्तित्वात आलेल्या प्रभाग क्रमांक ११ मध्ये सध्या राजकीय वातावरण तापले आहे. फक्त २३६१ मतदार असलेल्या या प्रभागातून तब्बल तेरा जणांनी इच्छुकता दाखविल्याने भाजपसमोर उमेदवार ठरवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. या प्रभागात जनतेने “काम करणाऱ्या” उमेदवारालाच पसंती देण्याचे संकेत दिले असून, साईबाबांचा आशीर्वाद अखेर कोणावर पडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रभाग क्रमांक ११ हा अष्टविनायक नगर, साई मंदिर परिसर, जी.एस. कॉलनी, फिल्टर भाग, सौभाग्य नगर, स्वामी शाळा परिसर, रामचंद्र नगर व गजानन महाराज मंदिर परिसर या भागांचा समावेश असलेला एक समिश्र वस्तीचा भाग आहे. या भागातील मतदार अनेक वर्षांनी नगरपरिषद निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ही जागा सामान्य प्रवर्गासाठी राखीव असल्याने इच्छुकांची संख्या मोठी झाली आहे.

भाजपकडून माजी नगराध्यक्ष शितल पाटील, सोपान पाटील, विलास चौधरी, शुभम नमायते, सामाजिक कार्यकर्ते शरद राजपूत, बुधा महाजन, योगेश महाजन व प्रणव पाटील हे संभाव्य उमेदवारांच्या चर्चेत आहेत. तर एसटी महिला प्रवर्गातून शबनम यासीन तडवी व सीमा आरिफ तडवी यांच्या नावांचीही चर्चा आहे. दुसरीकडे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून सुखदा रविंद्र पवार या देखील इच्छुक आहेत.

या प्रभागातील सर्वात चर्चेचा विषय म्हणजे दोन ख्यातनाम पत्रकार — कृष्णा पाटील आणि दिलीप वैद्य — यांच्या संभाव्य उमेदवारीचा आहे. दोघांनीही नागरिकांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी फिरवली असून, लोकांमध्ये त्यांची चांगली ओळख आहे. या दोघांपैकी कोणीही निवडणुकीच्या रिंगणात उतरले, तर भाजपच्या समीकरणात मोठी गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

दरम्यान, स्थानिक मतदारांनी “मोठं नाव नव्हे, काम करणारा उमेदवार हवा” अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे. काही मतदारांनी “पुढील पाच वर्षांत काय काम करणार, याचा लेखी संकल्प देणाऱ्या उमेदवारासाठी आम्ही स्वतःहून प्रचार करू,” असा निर्धार व्यक्त केला आहे. या वातावरणामुळे प्रभाग क्रमांक ११ मधील निवडणूक लढत अधिकच रंगतदार होणार असल्याचे स्पष्ट दिसते.

शहरात थंडीची चाहूल लागली असली, तरी या प्रभागातील राजकीय वातावरण मात्र चांगलेच तापले आहे. अखेर साईबाबांचा आशीर्वाद कोणावर पडतो आणि मतदार कोणत्या “कामदार” उमेदवाराला संधी देतात, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.


Protected Content

Play sound