Home क्राईम 12 हजार कोटींच्या ड्रग्ज फॅक्टरीचा पर्दाफाश ! मिरा-भाईंदर पोलिसांची  कारवाई

12 हजार कोटींच्या ड्रग्ज फॅक्टरीचा पर्दाफाश ! मिरा-भाईंदर पोलिसांची  कारवाई

0
140

मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा ।  देशात ड्रग्ज विरोधात सुरू असलेल्या मोहिमेला मोठे यश मिळाले असून, मिरा-भाईंदर पोलिसांनी सध्या देशातील सर्वात मोठ्या अमली पदार्थांच्या कारवाईपैकी एक करत तब्बल ₹12,000 कोटींच्या एमडी ड्रग्ज फॅक्टरीचा पर्दाफाश केला आहे. तेलंगणातील चेरापल्ली येथे असलेल्या या गुप्त फॅक्टरीवर पोलिसांनी छापा टाकून 32,000 लिटर कच्चा माल (रॉ मटेरियल) जप्त केला आहे. या प्रकरणात 12 जणांना अटक करण्यात आली असून, त्यात फॅक्टरीचा मालक, केमिकल अॅनालायझर आणि एक परदेशी नागरिकाचा समावेश आहे.

ही कारवाई विशेष ठरते कारण तिची सुरुवात केवळ 200 ग्रॅम ड्रग्जच्या जप्तीनंतर झाली होती. एका छोट्याशा अटकेपासून सुरू झालेल्या तपासाची साखळी अखेर ₹25 लाखांच्या ड्रग्जपासून थेट ₹12,000 कोटींच्या प्रचंड रॅकेटपर्यंत पोहोचली. एक महिन्याच्या अथक मेहनतीनंतर मिरा-भाईंदर पोलिसांच्या क्राईम ब्रँच युनिट फोरने ही यशस्वी कारवाई उभी केली आहे.

छाप्यात जप्त करण्यात आलेले ड्रग्ज अत्यंत उच्च प्रतीचे असून, याचा महाराष्ट्रासह इतर अनेक राज्यांमध्ये आंतरराज्य पुरवठा केला जात असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. पोलिसांच्या मते, ही फॅक्टरी केवळ देशांतर्गतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही तस्करीसाठी कार्यरत होती. या प्रकारामुळे केंद्र आणि राज्य सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ माजली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फॅक्टरीचा मालक बीएसई (केमिकल) इंजिनीअर आहे. त्याने केमिकल प्रक्रियेतील तज्ज्ञांची मदत घेऊन अत्यंत गुप्तपणे ही फॅक्टरी उभारली होती. यासोबतच त्याच्या अटकेनंतर आणखी काही तांत्रिक व्यक्तींना अटक करण्यात आली असून, केमिकल अॅनालायझर आणि एका परदेशी नागरिकालाही ताब्यात घेण्यात आले आहे.

या कारवाईमुळे ड्रग्ज निर्मिती आणि तस्करीच्या आंतरराज्य जाळ्याचा मोठा भाग उद्ध्वस्त झाला असून, पोलिसांच्या म्हणण्यानुसार आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. संपूर्ण रॅकेट उखडून टाकण्यासाठी पुढील तपास सुरु आहे. पोलिस आयुक्त निकेत कौशिक यांनी सांगितले की, ही कारवाई एक महिन्याच्या सततच्या तपासानंतर यशस्वी झाली असून, या युनिटच्या कार्यक्षमतेमुळे हा घातक कारखाना उध्वस्त करणे शक्य झाले.

या यशस्वी कारवाईबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पोलिसांचे कौतुक केल्याची माहिती आयुक्त कौशिक यांनी दिली. या प्रकरणामुळे महाराष्ट्र आणि देशभरात मोठी खळबळ उडाली असून, ड्रग्ज विरोधातील लढाईत ही मोहीम एक टर्निंग पॉईंट ठरत असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत


Protected Content

Play sound