मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आमदारांच्या पाठोपाठ आता खासदारांचा मोठा गट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले असून १२ खासदार या गटात दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. हे खासदार उद्या पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या गटाची आज हॉटेल ट्रायडंट इथं बैठक पार पडली या बैठकीत नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात मुख्य नेते म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली. यासोबत नेतेपदी रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, या बैठकीला शिवसेनेचे १२ खासदार हे ऑनलाईन या प्रकारात उपस्थित होते अशी माहिती समोर आली आहे.
आता हे सर्व १२ खासदार शिवसेनेतून शिंदे गटात दाखल होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. उद्या एकनाथ शिंदे हे दिल्लीत जात असून त्यांच्या उपस्थितीत हे सर्व खासदार पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. यामुळे विधानसभेच्या पाठोपाठ आता लोकसभेतही शिवसेनेत उभी फूट पडल्याचे दिसून आले आहे.