मुंबई प्रतिनिधी । आज विधीमंडळत विरोधक आणि सत्ताधार्यांमध्ये सभागृहात जोरदार संघर्ष झाल्यानंतर भाजपच्या १२ आमदारांना एक वर्षासाठी निलंबीत करण्यात आले असून यात माजी मंत्री तथा जामनेरचे आमदार गिरीश महाजन यांचा समावेश आहे.
विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ओबीसी आरक्षणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली. ओबीसी आरक्षणाबाबत केंद्र सरकारकडून एम्पिरिकल डेटा मागवण्याबाबत ठराव मांडण्यात आला. यावेळी विरोधकांनी गोंधळ घातला. या गोंधळातच सभागृहात ठराव मांडण्यात आला. त्यानंतर तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी आवाजी मतदानाने ठराव मंजूर केला. ठराव विधानसभेत पारित होत असताना विरोधक चांगलेच आक्रमक झाले होते. यावेळी आमदार संजय कुटे आणि गिरीश महाजन यांच्यासह अनेक आमदार वेलमध्ये उतरले. आमदार संजय कुटे आणि गिरीश महाजन यांनी अध्यक्षांचा राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. मात्र परिस्थितीचे भान ठेवत आमदार आशिष शेलार यांनी संजय कुटे, गिरीश महाजन यांच्यासह सर्व आमदारांना वेलमधून आपल्या जागेवर नेलं.
विधानसभा स्थगित झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या दालनात देवेंद्र फडणवीस गेले असताना विरोधी आमदार आणि सत्ताधारी आमदार यांच्यात धक्काबुक्की झाली. यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमधील वाद विकोपाला गेल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, याच वादामुळे भाजपच्या १२ आमदारांना निलंबीत करण्यात आले असून यात पराग अळवणी, राम सातपुते, संजय कुटे, आशिष शेलार, अभिमन्यू पवार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, शिरीष पिंपळे, जयकुमार रावल, योगेश सागर, नारायण कुचे, किर्तीकुमार बागडिया यांना वर्षासाठी निलंबित करण्यात आलं आहे. यामुळे आता हे आमदार एक वर्षापर्यंत विधानसभेच्या कामकाजात सहभागी होऊ शकणार नाहीत.