भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची मान्यता आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळाल्याने संपूर्ण महाराष्ट्रभर जल्लोषाचे वातावरण आहे. युनेस्कोने शिवरायांच्या १२ ऐतिहासिक गडकिल्ल्यांचा जागतिक वारसा यादीत समावेश केल्याच्या पार्श्वभूमीवर भुसावळ शहरात भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात आनंदोत्सव साजरा केला.
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात रेल्वे स्टेशनजवळ उभ्या असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार अर्पण करून, फटाके फोडून आणि जयघोष करत भाजप कार्यकर्त्यांनी आपल्या आनंदाला उधाण दिले. यावेळी शिवप्रेमी, कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. “जय भवानी, जय शिवाजी” च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची ही आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेली नोंद महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवासाठी अत्यंत गौरवास्पद असल्याचे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.

या आनंदाच्या क्षणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही विशेष उल्लेख करून त्यांचे आभार मानण्यात आले. कार्यकर्त्यांनी सांगितले की, युनेस्को यादीत शिवरायांचे किल्ले समाविष्ट होणे हे केंद्र सरकारच्या प्रयत्नांचे फलित आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे महाराष्ट्रातील आणि देशातील शिवप्रेमींना अभिमान वाटेल, असे वक्तव्य यावेळी करण्यात आले. भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी या निर्णयाचे श्रेय मोदी सरकारच्या संस्कृती जपणाऱ्या धोरणाला दिले.
शिवजयंतीसारख्या पर्वानंतर आलेल्या या घोषणेमुळे शिवभक्तांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. उपस्थित कार्यकर्त्यांनी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून, त्यांच्या कार्याचे स्मरण करत भविष्यातही या वारशाचे जतन करण्याची शपथ घेतली.



