जळगाव प्रतिनिधी । एकीकडे कोरोना रूग्णांची संख्या वाढत असली तरी बरे होणार्यांचा आकडाही वाढत आहे. यातच अवघ्या बारा दिवसांच्या बाळाने कोरोनावर मात केल्याचे दिसून आले आहे.
याबाबत माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथील २३ वर्षीय विवाहितेला २९ जुलै रोजी न्यूमोनिया झाल्याने तिला जिल्हा कोविड रुग्णालयात दाखल केले होते. तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला. संबंधीत महिला गर्भवती होती. ३० जुलैच्या रात्री दीड वाजता तिची प्रसुती झाली. बाळाचे नमुने घेण्यात आल्यानंतर अहवालही पॉझिटिव्ह आला. त्याला श्वसनाचा त्रास होत होता. त्याची ऑक्सिजनची पातळी देखील कमी झालेली होती. त्याच्या रक्तातील साखरेचे प्रमाणही सतत कमी अधिक होत होते. बाळाला आईचे दूधही पचत नव्हते. तर त्याला अँटी व्हायरस लसही देता येत नव्हती. अखेेर या बाळाने नऊ दिवसांनी आईचे दूध पचवायला सुरु केले. दहा दिवसांनी त्याचा अहवाल निगेटिव्ह आला. यामुळे त्याने अखेर कोरोना विरूध्दची लढाई जिंकली.
या शिशूवर शिशू अतिदक्षता कक्षात विभागप्रमुख बाळासाहेब सुरोसे, डॉ. अतुल गाजरे, डॉ. गिरीश राणेे, डॉ. सुप्रिया सोनवणे यांच्या देखरेखीखालील चमूने यशस्वी उपचार केले.