नवी दिल्ली (वृत्तसंस्था) तामिळनाडूच्या ज्या शेतकऱ्यांनी २०१७ मध्ये न्याय्य हक्कासाठी आंदोलन करून साऱ्या जगाचे लक्ष वेधणाऱ्यांपैकी १११ शेतकरी आता पीएम नरेंद्र मोदींविरुद्ध निवडणूक लढणार आहेत. दोन वर्षांपूर्वी सुरू केलेले आंदोलन अजुनही संपलेले नाही याची आठवण ते या माध्यमातून करून देणार आहेत.
तामिळनाडूच्या शेतकऱ्यांचा समूह शुक्रवारी त्रिची येथील रेल्वे स्टेशनवरून वाराणसीला रवाना झाला. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना शेतकऱ्यांनी यासंदर्भातील माहिती दिली. दरम्यान, मार्च २०१७ मध्ये तामिळनाडूच्या शेकडो शेतकऱ्यांनी दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन पुकारले होते. अय्याकन्नू यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ४० हजार कोटींचे पॅकेज आणि इतर मागण्या करण्यात आल्या होत्या. या आंदोलनात शेतकऱ्यांनी सुरुवातीला मुंडन केले, गवत खाऊन विरोध केला, उंदिर तोंडात धरून दुष्काळाची दाहता दर्शवली. कपडे काढून निदर्शने केली. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कवट्या गळ्यात बांधून आंदोलनाचे गांभीर्य दाखवले. पंतप्रधानांनी भेट घेऊन आंदोलकांचे ऐकून घ्यावे अशी मागणी करण्यात आली होती. या आंदोलनाच्या केवळ देशातच नव्हे तर जगभरात चर्चा झाल्या. तरीही मोदींनी त्यांची भेट घेतली नव्हती.