मुंबई –काँग्रेसने सरकारच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. राज्यात निधीवाटपामध्ये भेदभाव होत असल्याचा आरोप करत महाविकास आघाडीमधील ११ काँग्रेस आमदारांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.
एकीकडे राज्यातील कोरोना विषाणूच्या फैलावाचे संकट संपण्याचे नाव घेत नसताना दुसरीकडे सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील मानापमान नाट्यही जोरात सुरू आहे. काही दिवसांपूर्वी निर्णयप्रक्रियेत स्थान मिळत नसल्याने काँग्रेसने नाराजी व्यक्त केली होती. आता पुन्हा एकदा
ठाकरे सरकार निधी वाटपात दुजाभाव करत असल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी केला आहे. सर्वांना मतदारसंघात काम करायचं आहे. त्यामुळे सर्वांना समान निधी मिळाला पाहिजे. मात्र तसं होताना दिसत नाही आहे, राज्यातील काँग्रेस नेतृत्वाकडे याबाबात तक्रार करूनही न्याय मिळालेला नाही. त्यामुळे सत्ताधारी पक्षांमधील ११ आमदार उपोषणाच्या तयारीत असल्याचे त्यांनी सांगितले.
त्याबरोबरच याबाबतची तक्रार काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे केली जाणार आहे. त्यासाठी सोनिया गांधी यांची लवकरच भेट घेतली जाईल, असेही गोरंट्याल म्हणाले.