Home Cities अमळनेर दहावी-बारावी परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्यात ; PTA क्लासेस संघटनेचे शिक्षण विभागाला निवेदन

दहावी-बारावी परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्यात ; PTA क्लासेस संघटनेचे शिक्षण विभागाला निवेदन


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षा पूर्णतः कॉपीमुक्त वातावरणात पार पाडाव्यात, अशी ठाम मागणी अमळनेर येथील खाजगी कोचिंग क्लासेस संघटना (PTA) तर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात आज, ९ फेब्रुवारी रोजी, PTA च्या वतीने शिक्षण विभागाकडे अधिकृत निवेदन सादर करण्यात आले असून परीक्षांमधील गैरप्रकार थांबवण्यासाठी कठोर उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

हे निवेदन गट शिक्षणाधिकारी तसेच तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, अमळनेर यांना सादर करण्यात आले. यावेळी PTA संघटनेचे अध्यक्ष भैय्यासाहेब मगर, स्वर्णदीप राजपूत, सुधीर टाकणे, सुनील पाटील यांच्यासह संघटनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. आगामी बोर्ड परीक्षांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने वेळेत उपाययोजना कराव्यात, असा आग्रह यावेळी करण्यात आला.

निवेदनात मागील काही वर्षांच्या परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर कॉपी झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. या प्रकारामुळे गुणवत्तेऐवजी गुणफुगवट्याला चालना मिळत असून खऱ्या अर्थाने मेहनत करणाऱ्या व प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचे PTA संघटनेचे म्हणणे आहे. परीक्षेच्या हॉलमध्ये कॉपीमुक्त वातावरण नसेल, तर विद्यार्थ्यांच्या कष्टाचे मोल राहत नाही आणि शिक्षण व्यवस्थेवरील विश्वासही कमी होतो, असे मत संघटनेने व्यक्त केले आहे.

कॉपीमुक्त परीक्षा ही केवळ नियमांची अंमलबजावणी नसून ती विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी निगडित बाब असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य न्याय मिळावा, यासाठी परीक्षा केंद्रांवर कडक निगराणी, भरारी पथकांची प्रभावी नेमणूक आणि गैरप्रकारांवर तात्काळ कारवाई होणे आवश्यक असल्याची मागणी करण्यात आली आहे.

PTA संघटनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात कॉपीमुक्त परीक्षा अभियान राबवण्यात येत असून अमळनेर तालुक्यातही या अभियानाला प्रभावी पाठबळ देण्याची विनंती प्रशासनाकडे करण्यात आली आहे. परीक्षांमधील प्रामाणिकता अबाधित ठेवण्यासाठी शिक्षण विभाग, प्रशासन आणि समाजातील सर्व घटकांनी एकत्रितपणे जबाबदारी घ्यावी, असे आवाहनही या निवेदनातून करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound