दिवाळी मुहूर्तावर एसटीच्या ताफ्यात १०० ई-शिवाई बस दाखल

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्य परिवहन (एसटी) महामंडळ सध्या वाहनखरेदीवर भर देत आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर एसटीच्या ताफ्यात १२ मीटर लांबीच्या आणखी १०० ई-शिवाई गाड्या दाखल होणार असल्याचे एसटीच्या अधिका-यांनी सांगितले.

सध्या मुंबई-पुणे मार्गावर धावणा-या इलेक्ट्रिक गाड्यांच्या तुलनेत नव्या गाड्यांची आसनक्षमता अधिक आहे. त्यामुळे सणासुदीत प्रवाशांना आणखी बस मिळणार आहेत.
एसटीने ५,१५० इलेक्ट्रिक बस भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी १३८ मिडी ई-बसेस यापूर्वी महामंडळाच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. पहिल्या टप्प्यात नागपूर-चंद्रपूर या मार्गावर, त्यानंतर नाशिक-बोरीवली तसेच नाशिक-छत्रपती संभाजीनगर या मार्गावर या बसेस सुरू केल्या जाणार आहेत. या गाड्यांचे तिकीटदर सध्या चलनात असलेल्या ई-शिवाई बसेसप्रमाणेच ठेवण्यात येणार आहे.

मुंबई-पुणे मार्गावर धावणा-या ई-शिवनेरीच्या ताफ्यात मागच्या आठवड्यात १७ नव्या बस दाखल झाल्या आहेत. आतापर्यंत या मार्गावर ८३ गाड्या होत्या. नवीन बसगाड्यांच्या समावेशामुळे ई-शिवनेरीची संख्या आता १०० वर पोहोचली आहे. त्यामुळे दिवाळीत मुंबई-पुणे प्रवास करणा-या प्रवाशांनाही दिलासा मिळणार आहे. राज्य परिवहन महामंडळाने वाहक आणि चालकांसाठी मुंबई सेंट्रल एसटी डेपोमध्ये वातानुकूलित विश्रामगृह सुरू केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचे रविवारी उद्घाटन करण्यात आले. हे राज्यातील पहिले एसी विश्रामगृह असल्याची माहिती महामंडळाने दिली आहे.

Protected Content