खामगाव प्रतिनिधी । बुलढाणा जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता खामगाव एमआयडीसी भागातील हिंदुस्थान युनिलिव्हरतर्फे घाटपुरी कोवीड सेंटरला १०० बेड रूग्णांसाठी उपलब्ध करून दिले आहे.
गत दोन महिन्यांमध्ये कोविडचे प्रमाण कमी होत असली तरी तिसरी लहर कधी येईल सांगता येत नाही, या अनुषंगाने सर्वत्र तयारी सुरू असताना सामाजिक दायित्व म्हणून खामगाव एमआयडीसी भागातील हिंदुस्थान युनिलिव्हर कडून सातत्याने खामगाव सामान्य रुग्णालय, शेगाव सामान्य रुग्णालय,जिल्हाधिकारी कार्यालय, एसडीओ कार्यालय खामगाव यांच्या माध्यमातून मदतीचा ओघ सुरूच ठेवला आहे. आज सुद्धा घाटपुरी खामगाव येथील कोविड सेंटरला हिंदुस्तान युनिलिव्हरने सुमारे १०० बेड रुग्णांसाठी नव्याने तयार करून दिले आहेत. या बेड प्रदान प्रसंगी खामगाव उपविभागाचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, खामगाव तहसीलचे तहसीलदार शीतलची रसाळ, हिंदुस्तान युनिलिव्हरच्या फॅक्टरी मॅनेजर श्रीविद्या राजन, हिंदुस्तान युनिलिव्हरचे एच आर मॅनेजर देवेश तोमर, एच आर.एक्झिक्यूटिव्ह वैद्य, बिडवे, कामगार प्रतिनिधी अनिल ढोले, सुधाकर कर्वे, गजेंद्र गायकी यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
कार्यक्रम घाटपुरी कोविड सेंटरमध्ये आज ११ जून रोजी सकाळी १० वाजता पार पडला. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, कोविडच्या नियंत्रणासाठी प्रशासन सज्ज असून कोणत्याही परिस्थितीत रुग्णाला वाचविण्याचे ध्येय आम्ही बाळगून आहोत. त्या अनुषंगाने रुग्णांना कुठलीही कमतरता पडू नये, यासाठी हिंदुस्तान लिव्हर कडून आज आम्हाला १०० बेडचे सहाय्य मिळाले आहे. त्यामुळे हिंदुस्तान युनिलिव्हर चे आम्ही आभार व्यक्त करतो. सोबतच येत्या काळात येणाऱ्या कोणत्याही कोविडच्या लहरीवर आम्ही यशस्वीपणे मात करण्यासाठी तयारी पूर्ण करीत आहोत असेही ते म्हणाले.