भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गणेशोत्सवाच्या निमित्ताने साजरे होणारे सामाजिक भान आणि सेवाभाव यांचे अनोखे मिश्रण शहरातील अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी उभे केले जाते. यंदा “एक दुर्वा समर्पण” या उपक्रमाचे नववे वर्ष होते आणि यंदाही गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा हात देत समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यात आली.

पाच दिवसांच्या या उपक्रमात यावल आणि भुसावळ तालुक्यांतील एकूण १८७ गरजू विद्यार्थ्यांना वह्या, पेन, रजिस्टर, पट्ट्या, पाट्या, रंगपेट्या, पेन्सिली आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. याशिवाय, उपक्रमाच्या समारोप दिनी एक विशेष उपक्रम म्हणून गरजूंमधून निवड करण्यात आलेल्या १० विद्यार्थ्यांना सायकल भेट देण्यात आल्या, ज्यामुळे त्यांच्या शालेय प्रवासातील अडथळा दूर होणार आहे.

या उपक्रमाची सुरुवात यावल तालुक्यातील विरोदा येथील जिल्हा परिषद शाळेत झाली. त्यानंतर वढोदा आणि फेकरी येथील विद्यार्थ्यांपर्यंतही साहित्य पोहोचवण्यात आले. भुसावळ येथे झालेल्या सायकल वितरण सोहळ्यात प्रकल्प प्रमुख अमितकुमार पाटील, समन्वयक कपिल धांडे, सहसमन्वयक केतन महाजन यांच्यासह अंतर्नाद संस्थेचे अनेक पदाधिकारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सायकलींच्या उपलब्धतेसाठी दीपस्तंभ फाउंडेशनने पुढाकार घेतला. त्यांच्या मार्फत वापरात नसलेल्या पण चांगल्या अवस्थेतील सायकली पुनर्बाधित करून शिक्षणासाठी देण्यात आल्या. यामध्ये दीपस्तंभचे संस्थापक यजुर्वेंद्र महाजन, संचालक राजेंद्र पाटील, CSR प्रमुख योगेश सूर्यवंशी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनेक दात्यांनी आर्थिक आणि प्रत्यक्ष सहभाग दिला. त्यात प्रवीण बऱ्हाटे, अभिषेक चौधरी, देवानंद पाटील, तेजस पाटील, सचिन पाचपांडे यांचा विशेष उल्लेख करावा लागेल. दातृत्वाच्या या दिंडीत सहभागी झालेले सर्वजण खऱ्या अर्थाने समाजसेवेचे वारकरी ठरले.
या उपक्रमामुळे गरजू विद्यार्थ्यांचे शिक्षण अधिक सुलभ झाले असून, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद समाजातील सामूहिक प्रयत्नाचे प्रतिक आहे. “या पुढील काळात अधिक व्यापक स्तरावर हा उपक्रम राबवण्याचा आमचा मानस आहे,” असे प्रकल्प समन्वयक कपिल धांडे यांनी सांगितले.



