मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्युज वृत्तसेवा । राज्यातील आणखी 10 मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागणार असल्याचा खळबळजनक दावा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विधिमंडळात माध्यमांशी बोलताना केला.
राज्यात शिवसेना आणि भाजपा युती तुटल्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. तेव्हापासून दोन्ही पक्षांमधून विस्तव देखील जात नसल्याचं वारंवार दिसून आलं आहे. सध्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जोरदार कलगीतुरा रंगू लागला आहे. एकीकडे केंद्रीय तपास यंत्रणांनी सरकारमधील काही मंत्र्यांविरोधात कारवाई सुरू केली असताना दुसरीकडे राज्य सरकारने देखील भाजपाच्या काही माजी मंत्र्यांवर कारवाईचे संकेत दिले आहेत.
या पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका करताना खळबळजनक दावा केला आहे. अनिल देशमुख, अनिल परब, नवाब मलिक यांच्यावर भाजपाकडून सातत्याने आरोप केले जात असतानाच अजून किमान १० मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. विधिमंडळात माध्यमांशी बोलताना त्यांनी हा दावा केला.