भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) आणि लोहमार्ग पोलिसांनी संयुक्त कारवाईत पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेसमधून १० किलो गांजा जप्त केला आहे. जप्त केलेल्या गांजाची किंमत अंदाजे १ लाख २ हजार ९३० रुपये असल्याचे सांगण्यात आले. ही कारवाई करण्यात आली.
पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेसच्या सामान्य डब्यात एक बेवारस बॅग आढळून आली. प्रवाशांनी ही बॅग बोगीत पडलेली पाहिली, मात्र त्याचा मालक कोण आहे, हे स्पष्ट होऊ शकले नाही. गाडी भुसावळ जंक्शनवर थांबताच एका जागरूक प्रवाशाने ही बेवारस बॅग आरपीएफकडे जमा केली. आरपीएफच्या अधिकाऱ्यांनी ही बॅग ताब्यात घेत निरीक्षक आर. पी. मीणा यांच्या समोर उघडली.
बॅगेत पिवळ्या रंगाच्या कपड्यात “सफल पानमसाला” असे लिहिलेल्या दोन मोठ्या पिशव्या होत्या. त्या टेपने व्यवस्थित पॅक करण्यात आल्या होत्या. अधिकाऱ्यांना संशय आल्याने सहायक सुरक्षा स्टेशन अधिकारी शकील खान यांना पाचारण करण्यात आले. बॅगेतून उग्र वास येत असल्याने ती अधिक तपासली असता, त्यामध्ये सुकवलेला गांजा आढळला. त्याचे वजन १० किलो भरले. बाजारभावानुसार याची किंमत १ लाख २ हजार ९३० रुपये आहे.
या घटनेची माहिती रेल्वे सुरक्षा बलाचे वरिष्ठ आयुक्त चित्रेश जोशी यांना देण्यात आली. त्यानंतर आरपीएफने जप्त केलेला गांजा लोहमार्ग पोलिसांकडे सुपूर्द केला. या प्रकरणी लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस निरीक्षक सुधीर धायरकर हे पुढील तपास करत आहेत.